जगातील अन्य देशांप्रमाणे भारताचीही करोना व्हायरसच्या संकटाशी झुंज सुरु आहे. भारतासमोरही या आजाराने मोठे आव्हान निर्माण केले आहे. पण या संकटकाळात भारत स्वत: बरोबर इतर देशांचीही मदत करुन माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे.

कुवतेमध्ये करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. नेमकी परिस्थिती कशी हाताळावी हा कुवेतसमोर प्रश्न निर्माण झाल्याने भारताने शनिवारी १५ सदस्यांची मेडिकल टीम इंडियन एअर फोर्सच्या विशेष विमानाने कुवेतला पाठवली. कुवेतचे पंतप्रधान शेख सबा अल खालिद अल हमाद अल सबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला व करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी मदतीची मागणी केली.

त्यानंतर भारताने लष्कराची मेडिकल टीम कुवेतला पाठवली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बीपिन रावत यांना फोन केला व लष्कराचे डॉक्टर्स व मेडिकलची टीमची व्यवस्था करण्यास सांगितले. एअर फोर्सचे सी १३० हरक्युलिस हे मालवाहतूक विमान कुवेतमध्ये पोहोचल्यानंतर जयशंकर यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. ‘भारताची रॅपिड रिसपॉन्स टीम कुवेतमध्ये दाखल’ असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.

कुवेतमध्ये किती प्रमाणात संसर्गाची बाधा झाली आहे. त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी टीम पाठवा अशी सूचना मोदींनी जयशंकर यांना केली. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्याने ही माहिती दिली. “भारत आणि आखाती देशांमध्ये मजबूत संबंध निर्माण होत आहेत. सध्या प्रत्येक देश आपल्यापुरता विचार करत आहे. अशा स्थितीत भारत आखाताकडे दुर्लक्ष करु शकत नाही” अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गरज पडली तर आणखी टीम पाठवण्यात येतील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. जवळपास १० लाख भारतीय तिथे वास्तव्याला आहेत. भारताने पाठवलेली मेडिकल टीम दोन आठवडे तिथे राहण्याची शक्यता आहे. चाचणी आणि उपचारांमध्ये ही टीम मदत करेल तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी प्रशिक्षित करेल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली.

रशिया, यूएईला पाठवणार HCQ औषधांचा साठा
करोना व्हायरसमुळे सर्वाधिक बेजार झालेल्या अमेरिका, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांना भारताने सर्वप्रथम हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा केला. त्यानंतर भारत आता रशिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांना HCQ, पॅरासीटेमॉल या औषधांचा पुरवठा करणार आहे. रशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे भारताचे सर्वात जवळचे मित्र आणि रणनितीक भागीदार असलेले देश आहेत.

युगांडा, इक्वाडोर या देशांनाही HCQ औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. रशियाला दोन औषधांचा पुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २५ मार्च रोजी चर्चा झाली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.