चीन, भारत व रशिया हे तीन देश मोठय़ा प्रमाणात उत्सर्जनातून हवेचे प्रदूषण करीत आहेत व त्यांचे औद्योगिक प्रकल्प व कचरा डेपोतून सागरात सोडण्यात येणारा कचरा आमच्यापर्यंत येत आहे, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

हवामान बदल हा गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, मी पर्यावरणवादीच आहे तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, हवामान बदलाची मला चिंताच वाटते, मलाही स्वच्छ हवा व पाणी हवे आहे. न्यूयॉर्क येथे इकॉनॉमिक क्लबच्या कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते.

ते म्हणाले की, ‘पॅरिस हवामान करार हा एकतर्फी, भयानक व आर्थिकदृष्टय़ा एकांगी होता, त्यामुळे अमेरिकेतील उद्योग तीन वर्षांत बंद पडले असते. ऊर्जेसाठी खननकाम करू नका, कुठे खणू नका, काही करू नका असे र्निबध त्यात होते, अमेरिकेसाठी तो करार भयानकच होता त्यामुळे आमचे लाखो कोटी डॉलर्सचे नुकसान झाले असते. २०३० पर्यंत चीनने प्रदूषणावर काही उपाय करणे त्यात अपेक्षित नव्हते. रशियालाही त्यात काही तोशीस नव्हती. प्रदूषण निवारणासाठी अमेरिकेने भारताला पैसे द्यावेत, असे अपेक्षित होते. भारत विकसनशील देशाच्या नावाखाली अशा सवलती मागत असेल तर आम्हीही विकसनशील देश आहोत. अमेरिका हा जमिनीचा लहान तुकडा आहे. तुलनेने चीन, भारत, रशिया हे देश प्रदूषण रोखण्यासाठी काहीही करीत नाहीत मग आमच्या देशाकडून अपेक्षा करणे गैर आहे. ते आमच्या देशाबाबत बोलतात मग आम्ही त्यांच्या विषयी का बोलू नये. आम्ही विमाने बाळगू नयेत,  गायी बाळगू नयेत असे त्यांना अपेक्षित आहे मग चीनचे काय, असा प्रश्न उरतो.’