‘जीसॅट-३०’चे यशस्वी प्रक्षेपण

 बंगळुरू : ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. जीसॅट-३० या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार असून त्यामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे.

यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-४ ए ऐवजी आता जीसॅट-३० हा उपग्रह काम करणार आहे.

जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच सेवा यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. जलवायुमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

या दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.

दक्षिण अमेरिकेत फ्रान्सच्या ताब्यातील कावरू येथील अवकाश तळावरून हा उपग्रह पहाटे २.३५ वाजता (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे झेपावला. युरोपच्या एरिसयन स्पेसच्या एरियन ५ या प्रक्षेपकाने ३८ मिनिटे २५ सेकंदात हा उपग्रह अपेक्षित कक्षेत स्थापित करण्यात आला.

इस्रोच्या यू.आर राव उपग्रह केंद्राचे संचालक पी. कुन्हीकृष्णन हे प्रक्षेपणाच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी इस्रो व एरियन स्पेसच्या चमूचे अभिनंदन केले. नवीन वर्षांतील इस्रोचे पहिले प्रक्षेपण यशस्वी झाले असून इस्रोच्या हासन येथील नियंत्रण कक्षाने या उपग्रहाचा ताबा घेतला आहे. हा उपग्रह उड्डाणानंतर व्यवस्थित असल्याचे दिसून आले आहे. कक्षा विस्तारण्याच्या प्रयत्नावेळी या उपग्रहाचे दोन सौर पंख उघडण्यात येतील. सर्व कक्षांतरे पूर्ण झाल्यानंतर तो कार्यान्वित होणार आहे. भारताच्या उपग्रहाबरोबर युटेलसॅट कनेक्ट हा दूरसंचार उपग्रहही सोडण्यात आला.एरियन स्पेस संस्थेने १९८१ मध्ये भारताचा अ‍ॅपल हा उपग्रह सोडला होता, त्यानंतर आतापर्यंत एकूण २४ उपग्रह सोडले आहेत.

वर्षभरात २५ मोहिमा

इस्रोने ट्विट संदेशात म्हटले आहे, की जीसॅट ३० उपग्रह एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वीरित्या सूर्यसापेक्ष कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. एरियन स्पेसचे मुख्य  कार्यकारी अधिकारी स्टीफनी इस्राल यांनी सांगितले,की २०२० मधील सुरूवात जीसॅट ३०  उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडून करण्यात आली आहे.  वर्षभरात एकूण २५ मोहिमा अपेक्षित आहेत.

‘जीसॅट ३०’ची वैशिष्टय़े

* वजन ३३५७ किलो

* आय- ३ के यंत्रणेत सुधारणेने दूरसंचार सेवेत बदल

* १२ सी व १२ केयू ट्रान्सपाँडर्सचा समावेश

* इन्सॅट ४ ए उपग्रहाची जागा घेणार.

* कार्यकाल १५ वर्षे

* डीटीएच, टेलिव्हिजन अपलिंक व व्हीसॅट सेवांसाठी उपयुक्त

* एटीएम, स्टॉक एक्स्चेंज, इ-गव्हर्नन्ससाठी कनेक्टिव्हिटी सुधारणार