करोनाचा प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात ब्रेक लागला. मात्र, लॉकडाउनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला असून, बेरोजगारी संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात होती. हा धोका आता समोर येऊ लागला आहे. नोकर भरतीला ब्रेक लावला जात असून, गेल्या मागच्या दोन महिन्यात नोकर भरतीमध्ये ६१ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे दोन ते अडीच महिने संपूर्ण जनजीवन ठप्प झालं होतं. लॉकडाउनमुळे उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आर्थिक फटका सहन करावा लागल्यानं अनेक उद्योगांनी नोकर कपातही केली आहे. दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांच्या काळात नोकर भरतीला मोठा ब्रेक लागला असल्याची माहिती समोर आली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं नोकरी डॉट कॉमच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

करोना विषाणूचा प्रार्दुभाव व लॉकडाउन लागू केल्यानं मोठा फटका बसला आहे. भारतामध्ये नोकर भरती संदर्भातील प्रक्रियेत मोठी घट झाली आहे. मे महिन्यात नोकर भरतीत ६१ टक्क्यांची घट झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात नोकर भरतीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची नोंद झाली आहे, असं जॉब पोर्टल असलेल्या नोकरी डॉट कॉमनं म्हटलं आहे.

लॉकडाउनमुळे उद्योगांबरोबर सेवा क्षेत्रासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर कपातचं पाऊल उचललं आहे. त्याचबरोबर दोन महिन्यांच्या काळात सगळ्या हालचाली बंद असल्याचा परिणाम नोकर भरतीवर झाला आहे.