२००८ च्या मुंबई  हल्ल्यातील सूत्रधार व लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झाकी उर रेहमान याची सुटका करून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या संकेतांचे उल्लंघन केले आहे. मुंबईवर त्यावेळी झालेल्या  दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक ठार झाले होते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनीच हा मुद्दा आता पाकिस्तानकडे उपस्थित करावा, अशी मागणी भारताने केली आहे.
भारताने संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध समितीचे अध्यक्ष जिम मॅके यांना संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी पत्र पाठवले असून त्यात लख्वीची सुटका हा संयुक्त राष्ट्रांच्या ठराव क्रमांक १२६७ चे उल्लंघन आहे असे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी लष्कर-ए-तय्यबा व अल काईदा या संघटनांवर र्निबध लादले आहेत.अलीकडेच लख्वी याची सुटका करण्यात आली असून तो आता मोकाट सुटला आहे.
पुन्हा अटक करण्याची मागणी
लख्वी याला मंजूर करण्यात आलेल्या जामिनाची रक्कमही संबंधित समितीच्या र्निबधांच्या नियमास धरून नाही, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लख्वी याची सुटका करण्यात आल्यामुळे ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जर्मनी आदी देश चिंतेत पडले असून त्याला पुन्हा अटक करण्यात यावी, अशी मागणी या देशांनी अमेरिकडे केली आहे.