भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.

देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

निर्बंधांचे उल्लंघन, वेगाने पसरणाऱ्या विषाणूंमुळेच रुग्णांत वाढ
कोविड निर्बंधांचे पालन लोक कमी प्रमाणात करीत आहेत, त्याशिवाय कोविडच्या जास्त संसर्गजन्य विषाणूचे प्रकार भारतातही आले आहेत, यामुळे सध्या कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे, असं मत अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या देशात करोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांची संख्या काही राज्यात वेगाने वाढताना दिसत आहे.

गुलेरिया यांनी सांगितले की, “जर ही स्थिती बदलली नाही तर संसर्ग वाढून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येईल. त्यामुळे कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्बंधांचे पालन करण्यात ढिलाई दाखवता कामा नये. प्रशासन व अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर लोकांचे वर्तन कोविड प्रतिबंधक असेच राहील याची काळजी घ्यावी. फेब्रुवारीच्या सुमारास जेव्हा रुग्णवाढ कमी होत होती, तेव्हा लोकांनी नंतर कोविड प्रतिबंधक वर्तनात ढिलाई केली. विषाणू आता कमकुवत झाला किंवा तो गेला असे समजून लोकांचे वर्तन सुरू होते. लोक आता हा विषाणू फार गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. जर तुम्ही बाजारपेठा, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल येथे गेलात तर तेथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसेल. याच ठिकाणांहून करोनाचा प्रसार होत असतो हे ध्यानात ठेवा. याआधी जर एक रुग्ण आजारी पडला तर त्याच्या संपर्कातील तीस टक्के व्यक्ती बाधित होत असत आता त्यापेक्षा अधिक लोकांना एका व्यक्तीकडून संसर्ग होत आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग व दर वाढला असून जास्त वेगाने पसरणारे करोना विषाणू सध्या भारतात आहेत”.

‘स्पुटनिक ५’ लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी
करोनाचा वेगाने फैलाव होत असताना देशाच्या लसीकरण मोहिमेस आणखी बळ मिळाले आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक ५’ या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने भारताच्या औषध महानियंत्रकांना केली.

रशियाच्या ‘स्पुटनिक ५’ लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्याबाबतच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या अर्जावर केंद्रीय औषध नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने सोमवारी चर्चा केली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेसंबंधीच्या तपशिलाची पडताळणी केल्यानंतर समितीने ‘स्पुटनिक ५’ लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. आता ‘स्पुटनिक ५’ लशीच्या वापराबाबत भारताचे औषध महानियंत्रक अंतिम निर्णय घेतील. त्यांनीही मंजुरी दिल्यास ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’नंतर भारताच्या करोनाविरोधी लढ्यात ‘स्पुटनिक ५’ या तिसऱ्या लशीचे बळ मिळणार आहे.s