देशामध्ये मागील आठवडाभरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्ये रुग्णसंख्येची वाढ ही ६७ टक्के इतकी होती. एका आठवड्यामध्ये त्यापूर्वीच्या आठवड्यापेक्षा एक लाख अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील काही आठवड्यांमध्ये मृत्यू होण्याच्या प्रमाणात ४१ टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्या आठवड्यामध्ये करोनामुळे देशभरात एक हजार २३९ जणांचा मृत्यू झालाय. दिलासा देणारी बातमी म्हणजे रुग्णसंख्येच्या प्रमाणात ही वाढ आधीपेक्षा कमी आहे.

मार्च १५ ते मार्च २१ दरम्यान देशामध्ये दोन लाख ६० हजार नवे रुग्ण आढळून आले. त्यापूर्वीच्या आठवड्यात एक लाख ५५ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यातील वाढ ही सर्वधिक रुग्णसंख्या वाढीपैकी एक ठरली आहे. यापूर्वी जुलै २० ते २६ च्या दरम्यान रुग्णसंख्या ३४ टक्क्यांनी वाढली होती. जुलैमधील या रुग्णवाढीत आधीच्या आठवड्यापेक्षा ८० हजार अधिक रुग्ण आढळून आले होते.

रविवारी भारतामध्ये करोनाचा ४७ हजार ४७ रुग्ण आढळून आले. नोव्हेंबर ११ नंतर म्हणजेच १३० दिवसांनंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी ३० हजार ५३५ रुग्ण आढळून आलेत. जानेवारी १३ नंतर पहिल्यांदाच देशात २४ तासांमध्ये कोरनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे. रविवारी देशात करोनामुळे २१३ जणांचा मृत्यू झाला. मागील ७२ दिवसांमध्ये म्हणजेच जानेवारी ८ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. यापैकी ९९ जण महाराष्ट्रात तर पंजाबमध्ये ४४ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे केरळमध्ये १३, छत्तीसगडमध्ये १० आणि तामिळनाडूमध्ये नऊ जाणांचा करोनामुळे मृत्यू झालाय.

आठवडाभरात देशात आढळून आलेल्या २ लाख ६० हजार ५१८ रुग्णांपैकी १ लाख ६५ हजार २६९ रुग्ण हे महाराष्ट्रातील असल्याचे राज्य सरकारांच्या माध्यमातून जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये मागील आठवड्यामध्ये आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ही संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात आढळलेल्या रुग्णसंख्येपेक्षाही अधिक आहे. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात १ लाख २८ हजार ६७१ रुग्ण आढळून आले होते. भारतामधील रुग्णसंख्येही वाढ ही फेब्रुवारी महिन्याच्या ७५ टक्के इतकी आहे. मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्येही रविवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात तीन हजार ७७९ रुग्ण आढळून आलेत. ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे.

आणखी वाचा- पुढील काही वर्ष आपल्याला मास्क घालूनच फिरावं लागेल; तज्ज्ञांचा इशारा

महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढल्याचं दिसून आलं. पंजाबमध्ये २ हजार ६६९ रुग्ण आढळून आले. सप्टेंबर १९ नंतर ही पंजाबमधील रुग्णसंख्या वाढीची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. १७ सप्टेंबर रोजी पंबाजमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकाच दिवशी २ हजार ८६९ रुग्ण आढळून आले होते.

गुजरातमध्ये १ हजार ५८० नवे रुग्ण आढळून आले. २८ नोव्हेंबरनंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. मध्य प्रदेशमध्ये १ हजार ३२२ रुग्ण आढळून आले असून डिसेंबर ८ नंतरही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचप्रमाणे डिसेंबर १४ नंतर पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये रुग्णसंख्यावाढीने उच्चांक गाठला असून रविवारी येथे १ हजार २८९ रुग्ण आढळून आले. दिल्लीमध्ये डिसेंबर २६ नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजेच ८२३ रुग्ण आढलून आले आहेत. केरळमध्ये १ हजार ८७५, कर्नाटकमध्ये १ हजार ७१५, छत्तीसगडमध्ये एक हजार, उत्तर प्रदेशमध्ये ४९६ तर राजस्थानमध्ये ४७६ रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी वाचा- भारतीयांना चिंतेत टाकणारी बातमी; देशात करोना रुग्णांचा नवा उच्चांक

कर्नाटकमध्ये आठवड्याभरामध्ये ९ हजारहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा मागील आठवड्यापेक्षा दुप्पट आहे. गुजरातमध्ये मागील सात दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवाळीनंतरची ही राज्यातील सर्वाधिक वाढ आहे.