काही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधान बैरूत येथे झालेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानीही झाली होती. स्फोटाला काही दिवसांचा कालावधी लोटला असला तरी आताही मृतांची संख्या वाढल्याचं वृत्त समोर येत आहे. तर काही जण अद्यापही बेपत्ता झाले आहेत. त्यांचा सध्या शोध सुरू आहे. दरम्यान, आता लेबनॉनच्या मदतीला भारतानं हात पुढे केला असून त्यांना आपात्कालीन मदतही पाठवण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर यांनी दिली.

भारतानं लेबनॉनसाठी ५८ मेट्रिक टन आपात्कालीन मदत पाठवली आहे. यामध्ये वैद्यकीय मदतीसह अन्नधान्याचाही समावेश असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर दुसरीकडे ४ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्फोटातील मृतांची संख्या वाढून आता १७८ इतकी झाली आहे. तर ३० जण अद्यापही बेपत्ता आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी देण्यात आली.
संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार या स्फोटात सहा रुग्णालयांच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. यापूर्वी या रुग्णालयांची संख्या तीन असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून १५ किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर असलेल्या ५५ रुग्णालायांपैकी केवळ अर्धीच रुग्णालये सामान्यरित्या सुरू आहेत. तर ४० टक्के रुग्णालयांवर या स्फोटाचा मध्यम ते गंभीर स्वरूपाचा परिणाम झाला असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

या स्फोटामुळे १२० शाळांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये जवळपास ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत होते, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे. तर ५० हजारांपैकी १ हजार घरांचंही पूर्णपणे नुकसान झालं आहे. परंतु या ठिकाणी स्फोटामुळे अन्नधान्याची कोणतीही कमतरता निर्माण झाली नसल्याचंही संयुक्त राष्ट्रानं आपल्या अहवालात म्हटलं आहे. बैरुत बंदरावरून ३० टक्के क्षमतेसह तर त्रिपोली बंदरावरून ७० टक्के क्षमतेसह काम सुरू होतं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.