श्रीलंका रविवारी आठ शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं. हे बॉम्बस्फोट होण्याआधी भारताने श्रीलंकेला एकूण तीन अलर्ट पाठवले होते. बॉम्बस्फोट होण्याच्या काहीवेळ आधी भारताने श्रीलंकेला सतर्कतेचा इशारा दिला होता. या घडामोडींशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने ही माहिती दिली. श्रीलंकेत झालेल्या या बॉम्ब स्फोटांमध्ये ३२१ निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला ५०० जण जखमी झाले.

आयएसआयएसच्या कोईमबतूर मॉडेलचा तपास करत असताना नॅशनल तौहीद जमातचा नेता मौलवी झाहरान बिन हाशिमचे व्हिडिओ एनआयएच्या पाहण्यात आले. त्यानंतर चार एप्रिल रोजी भारताने श्रीलंकेला पहिला अलर्ट दिला होता. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला टार्गेट केले जाऊ शकते असे भारताने पहिल्या अलर्टमध्ये म्हटले होते.

हल्ल्याच्या एकदिवस आधी दुसरा अलर्ट पाठवला होता. ज्यामध्ये पहिल्या अलर्टच्या तुलनेत ठोस माहिती होती. कुठल्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते ते नमूद केले होते असे या गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले. आत्मघातकी हल्लेखोरांनी तीन चर्च आणि चार हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या काही तास आधी तिसरा अलर्ट पाठवला होता.

तांत्रिक आणि मानवी सूत्रांच्या हवाल्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करुन हे अलर्टस देण्यात आले होते. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुद्धा भारताने बॉम्बस्फोटांआधी अलर्टस पाठवल्याचे मान्य केले.

इस्लामिक स्टेटने (आयसिस) श्रीलंकेमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. श्रीलंकेने आधी स्थानिक इस्लामिक संघटना नॅशनल तौहीद जमातवर संशय व्यक्त केला होता. बॉम्ब स्फोटांमध्ये इसिसच्या खूणा दिसतात असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते. श्रीलंकेमधील नागरी गृहयुद्ध संपल्यानंतर दशकभराने श्रीलंका आठ शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. परदेशी नागरीकांसह आठ भारतीयांचा या स्फोटांमध्ये मृत्यू झाला.