भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. मागील चार वर्षांमध्ये ही भारताची सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. असं झाल्यास भारत हा दक्षिण आशियामधील तिसरा सर्वात गरीब देश ठरेल. सध्या दक्षिण आशियातील गरीब देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्या वर असतील. बांग्लादेशबरोबरच भूतान, श्रीलंका आणि मालदीवही जीडीपीच्या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी करतील असं सांगितलं जात आहे.

आयएमएफच्या आकडेवारीनुसार दक्षिण आशियामध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश आहे. श्रीलंकेला सर्वाधिक फटका बसला असून त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागत असल्याचे आयएमएफची आकडेवारी सांगते. नेपाळ आणि भूतानच्या अर्थव्यवस्थेमध्ये या वर्षी सकारात्मक वाढ होणे अपेक्षित असल्याचे दिसून येत आहे. आयएमएफने पाकिस्तानच्या आर्थिक विकासाची आकडेवारी मात्र उघड केलेली नाही. भारताची आर्थिक परिस्थिती आता पुढील आर्थिक वर्षात सावरेल असा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे. त्यामुळे भारताचा जीडीपी बांग्लादेशच्या पुढे जाण्यासाठी सन २०२१ चे आर्थिक वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यानंतरही अगदी थोड्या फरकानेच भारत बांग्लादेशच्या पुढे असेल.

सन २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८.२ टक्क्यांपर्यंत असेल असं सांगितलं जात आहे. तर बांग्लादेशचा जीडीपी ५.४ टक्क्यांपर्यंत असेल. म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी हा दोन हजार ३० डॉलर तर बांग्लादेशचा एक हजार ९९० डॉलर इतका असेल.

पाच वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी हा बांग्लादेशपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक होता. मागील पाच वर्षांमध्ये बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर वर्षी बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये ९.१ टक्क्यांनी वाढ होत आहे. भारताच्या जीडीपीवाढीचा याच काळातील दर ३.२ टक्के इतका आहे. यामुळेच भारत आणि बांग्लादेशमधील जीडीपीमधील तफावत वेगाने कमी झाली आहे. निर्यात क्षेत्रात बांग्लादेशने मोठी मजल मारली आहे. देशातील गुंतवणूक आणि बचत याचा ताळमेळ उत्तम पद्धतीने साधण्यात आल्याने हे परिणाम दिसून येत असल्याचे तज्ज्ञ मंडळी बांग्लादेशच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात बोलताना सांगतात. या उलट मागील काही वर्षांमध्ये भारताची निर्यात मंदावली आहे. त्याचप्रमाणे देशातील गुंतवणूकही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.