21 September 2020

News Flash

‘भारत-पाकिस्तान यांनी थेट संवाद साधावा’

पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंध सामान्य होणे हे दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर या संपूर्ण क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे

| July 1, 2016 12:05 am

परस्परांमधील तणाव कमी करण्यासाठी भारत व पाकिस्तान यांनी ‘थेट संवाद’ साधण्याच्या आवश्यकतेवर अमेरिकेने भर दिला असून, काश्मीरच्या मुद्दय़ावरील बोलण्यांची गती, व्याप्ती आणि स्वरूप या दोन देशांनी मिळून ठरवायला हवे असे सांगितले आहे.

पाकिस्तान व भारत यांच्यातील संबंध सामान्य होणे हे दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर या संपूर्ण क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते मार्क टोनर म्हणाले. प्रादेशिक आर्थिक संबंध आणखी दृढ करण्यासाठी पावले उचलण्यात आल्यास रोजगार निर्मिती होऊ शकते, चलनफुगवटा कमी होऊ शकतो, तसेच ऊर्जेचा पुरवठा वाढू शकतो, असे त्यांनी बुधवारी सांगितले.

काश्मीरसह इतर द्विपक्षीय मुद्दय़ांवर बोलणी करणे भारत टाळतो आहे, असे वक्तव्य पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात टोनर यांनी वरील वक्तव्य केले.

काश्मीरबाबतच्या बोलण्यांची गती, कक्षा व स्वरूप निश्चित करणे हे भारत व पाकिस्तान यांचे काम असल्याचे आम्हाला वाटते, असे टोनर म्हणाले. तथापि, व्यावहारिक सहकार्य करण्याचा या दोन्ही देशांना फायदा होणार असल्यामुळे, तणाव कमी करण्याच्या उद्देशाने थेट संवाद साधण्यास आम्ही भारत व पाकिस्तान यांना आम्ही प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.

या क्षेत्रात अधिक स्थैर्य, लोकशाही आणि समृद्धी निर्माण होण्यास मदत होईल, अशा भारत व पाकिस्तान दरम्यानच्या सर्व प्रयत्नांना अमेरिकेचा दृढ पाठिंबा आहे, मात्र या मुद्दय़ाबाबतचा निर्णय दोन्ही बाजूंनीच घ्यायचा आहे, असे मत टोनर यांनी व्यक्त केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 12:05 am

Web Title: india should communicate with pakistan says us
Next Stories
1 इस्तंबूल विमानतळावरील हल्लाप्रकरणी १३ संशयित ताब्यात
2 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट
3 स्विस बॅंकेत भारतीयांकडून ठेवण्यात येणाऱ्या पैशामध्ये लक्षणीय घट
Just Now!
X