पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मते देशाची राजधानी फक्त दिल्लीतच नको, तर आणखी चार ठिकाणी असली पाहिजे. देशाला एक नव्हे, तर चार राजधान्या हव्या अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कोलकात्तामध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

“भारताला चार राजधान्या असल्या पाहिजेत असे माझे मत आहे. इंग्रजांनी कोलकात्त्यात बसून संपूर्ण देशावर राज्य केले. मग आपल्या देशात राजधानीचे शहर एकच का?” असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जींनी नियोजन आयोगाची पूनर्स्थापना करण्याची मागणी केली आहे. मोदी सरकारने नियोजन आयोग रद्द करुन, त्याजागी निती आयोग आणला. “निती आयोग आणि नियोजन आयोग एकत्र राहू शकतात. केंद्राने नियोजन आयोगाची पूनर्स्थापना करावी” अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. नियोजन आयोग ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संकल्पना होती. त्यामुळे आयोगाची पुन्हा स्थापना करावी असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“नेताजींनी जेव्हा भारतीय राष्ट्रीय लष्कराची स्थापना केली, तेव्हा त्यांनी गुजरात, तामिळनाडू, बंगाल सर्व भागातून लोकांना सामावून घेतले. ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा, या धोरणाविरोधात ते उभे राहिले. आपण आझाद हिंद स्मारक उभे करु. हे काम कसे केले जाते, ते आपण दाखवून देऊ” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.