निर्बंधांचा मान राखून  भारताने  इराणकडून तेल आयात करू नये असे अमेरिकेने म्हटले आहे. भारत व चीनसह इतर पाच देशांना अमेरिकेने इराणकडून तेल आयातीवर बंदी घालण्यास सांगितले असून अणुकरारातून एक वर्षांपूर्वी बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने इराणवर कडक निर्बंध लागू केले होते.

गेल्या वर्षी भारत, चीन, जपान यांच्यासह आठ देशांना अमेरिकेने इराणकडून तेल आयात करण्यास १८० दिवसांच्या काळासाठी परवानगी कायम ठेवली होती, पण आता अमेरिकेने इराणवर दबाव वाढवण्यासाठी या देशांना इराणकडून तेल आयात करू नये असा इशारा दिला आहे.  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी २ मे नंतर कुठल्याच देशाला इराणकडून तेल खरेदी करता येणार नाही असे संकेत दिले आहेत. ओमानच्या आखातात छाबहार बंदर बांधण्यासाठी भारताने सहकार्य केले होते त्याबदल्यात अमेरिकेने इराणकडून तेल  खरेदीची भारताला काही दिवस सवलत दिली होती.

अफगाणिस्तानातील संघर्षांत छाबहार बंदराचे मोठे सामरिक महत्त्व आहे. चीन व भारत हे इराणच्या तेलाचे सर्वात मोठे आयातदार असून जर त्यांनी आता ट्रम्प यांच्या आदेशानुसार तेलाची आयात थांबवली नाही, तर द्विपक्षीय संबंधावर त्याचे परिणाम होऊ शकतात.

भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशात इराक व सौदी अरेबियानंतर इराण तिसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात इराणने भारताला १८.४ दशलक्ष टन तेलाची निर्यात केली होती. दक्षिण कोरिया व जपान हे देश तुलनेने इराणच्या तेलावर कमी प्रमाणात अवलंबून आहेत. त्यांचा इराणशी असलेला तेल व्यापार कमी झाला आहे.