पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व विकास प्रकल्प तडीस नेण्यासाठी पाकिस्तान सरकार चीनसोबत जाण्यास तयार आहे, असे स्पष्ट करतानाच भारताला टीकेचे लक्ष्य बनवले. पाकव्याप्त काश्मीरमधील कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक प्रकल्पांमधील चीन सहभागाविषयी भारताचे आक्षेप आहेत आणि त्यावरून भारताने चीनला यातून अंग काढून घेण्याविषयी सूचना केली आहे. शेजारील देशाची ही भूमिका आपल्याला योग्य वाटत नाही, अशा शब्दांत भारतावर टीकास्त्र सोडले.
काश्मीरमधील नागरिकांच्या लाभासाठी या भागांत काही विकास प्रकल्प येऊ घातले असतील तर ते पूर्णत्वास नेण्यास पाकिस्तानी सरकारच्या मनात कोणताही संकोच नाही. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आम्ही चीनसोबत जाण्यास तयार आहोत, असे परराष्ट्र कार्यालय प्रवक्त्या तस्नीम अस्लम यांनी पत्रकारांना सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन करत असलेल्या विकास प्रकल्पांचे बांधकाम त्वरित बंद करण्याची सूचना भारतीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केली होती. यावर अस्लम यांनी जोरदार टीका केली. यात चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्प सुविधांचे बांधकाम पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू आहे. यासंदर्भात स्वराज संसदेत माहिती देताना केंद्र सरकारने याबद्दल चीनकडे चिंता व्यक्त केल्याचे सांगितले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्पात चीनचा सहभाग आहे. याशिवाय झेलम नदीवरील मंगला धरणाची उंची वाढविण्यासाठी चीन पाकिस्तान सरकारला मदत करणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून संयुक्तरीत्या विनंती करण्यात आली तर काश्मीरच्या वादग्रस्त मुद्दय़ांवर तोडगा काढण्यास तयार असल्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी स्पष्ट केले होते. मून यांच्या या भूमिकेचे पाकिस्तान स्वागत करत आहे, असे अस्लम म्हणाल्या.