लडाखमध्ये रस्त्याची बांधणी करण्याचा निर्णय घेऊन भारताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतल्याची टीका चीनकडून भारतावर करण्यात आली आहे. सिक्किम सीमेवर डोकलाममध्ये दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचा थयथयाट सुरु आहे. लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात ९ दिवसांपूर्वी दोन्ही देशांचे सैनिक आमनेसामने आले होते. त्यामुळे लडाखमधील रस्त्याच्या निर्मितीला भारताने वेग दिला आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

‘लडाखमध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात करुन भारताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे,’ अशा शब्दांमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी भारतावर टीकास्त्र सोडले. पँगाँग सरोवरापासून २० किलोमीटर अंतरावर भारताकडून रस्त्याची उभारणी केली जाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनने भारतावर टीका केली आहे. भारताच्या गृह मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच लडाखमधील रस्त्याच्या कामाला वेग देण्याची सूचना केली होती. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला असून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आहे.

भारताकडून लडाखमध्ये रस्ते निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळेल, असा इशाराही चीनकडून देण्यात आला. जून महिन्यापासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जोरदार तणातणी सुरु आहे. भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोकलाममध्ये चीनकडून रस्त्याची उभारणी केली जात आहे. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळेच या रस्त्याच्या कामाला भारतीय सैन्याने आक्षेप घेतला. डोकलामवर चीन आणि भूतानकडून दावा सांगण्यात आला आहे.

भारत आणि चीनमधील तणाव १९८७ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत कायम राहिला आहे. १९८७ मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये सीमा प्रश्नावरुन दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते. गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये तळ ठोकून आहे. या भागातून भारतीय सैन्याने माघार घ्यावी, अशी मागणी चीनकडून करण्यात आली आहे. मात्र देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा भाग अतिशय संवेदनशील असल्याने भारतीय सैन्य मागे हटलेले नाही.