सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत भारतानं जगामध्ये टॉप तीन मध्ये स्थान राखलं आहे. अर्थात, गेल्या वर्षी पहिल्या स्थानी असलेला भारत यंदा याबाबतीत थोडासा घसरला आहे. दरवर्षी दावोस येथून ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. नोटाबंदी व जीएसटीसारख्या सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या योजना आणून देखील केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास ढळलेला नसल्याचे हा निर्देशांक सांगत आहे. उद्योग व्यवसायस अशासकीय संस्था व प्रसारमाध्यमे यांच्याकडे जनता कुठल्या नजरेने बघते या निकषावरही भारत विश्वसनीय या कसोटीस उतरला आहे.

अर्थात, गेल्या वर्षी भारत अग्रस्थानी होता व यंदा दोन स्थानांनी भारत घसरला आहे. पहिल्या दोन स्थानांवर चीन व इंडोनेशिया हे देश आहेत. एडलमन या संपर्कक्षेत्रातल्या बड्या कंपनीनं गेल्या आठवड्यात दावोसमध्ये हा निर्देशांक जाहीर केला. चीनने याबाबतीत मुसंडी मारली असून अग्रस्थान पटकावले आहे. तर सर्वाधिक घसरण अमेरिकेची झाली आहे. व्यापार व सुरक्षा या मुद्यांवर चीनने आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये अमेरिकेवर कुरघोडी केल्याची भावना असून त्यामुळेच चीनच्या सरकारवर लोकांचा विश्वास बळावल्याचा अनुमान काढण्यात येत आहे. तर भारताचा विचार केला तर प्रसारमाध्यमे, उद्योग व अशासकीय संस्था यावरील लोकांचा विश्वास 2017च्या तुलनेत घटला आहे. अर्थात, विश्वास घटला असला तरी अद्याप विश्वसनीय गटातून बाहेर फेकले जाण्याएवढी घट नसल्याने भारत तिसऱ्या स्थानी राहू शकला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीनं हा सर्व्हे घेण्यात आला होता. यामध्ये जगभरातल्या देशांमधील सरकारे, प्रसारमाध्यमे व अशासतीय संस्थांवरील विश्वास घटत चालल्याचे दिसून येत आहे. एकूण 28 देशांच्या बाबतीत ही पाहणी करण्यात आली आणि त्यापैकी 20 देशांमध्ये विश्वासाची पाकळी खालावल्याचे दिसून आले आहे. मात्र, भारताने त्या तुलनेत विश्वास अबाधित राखला असल्याचे दिसले आहे.

भारताला या पाहणीचा फायदा नजीकच्या काळात होईल असे मानण्यास जागा आहे. कारण, बाहेरच्या जगामध्ये अद्याप भारताच्या बाबतीत अविश्वासाचे वातावरण आहे. बाहेरच्या देशातील उद्योगांना भारतामध्ये व्यवसाय सुरू करण्यास भीती वाटते. करार करणे, लवादाकडे निकाल लागण्यास  विलंब होणे असे अनेक प्रकार विदेशी उद्योगांसाठी त्रासदायक आहेत. या बाबतीत, कॅनडा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया व स्वीडन हे देश सर्वाधिक विश्वसनीय मानण्यात येतात तर मेक्सिको, भारत, चीन व ब्राझिल या देशांवर सगळ्यात कमी विश्वास ठेवण्यात येतो.