गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक चकमक झाली होती. त्यात २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंदेखील चीनचे ४० जवान ठार केले होते. त्यानंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. एकीकडे चर्चा सुरू असल्या तरी चीननं मात्र आपल्या कुरापती कमी केल्या नाही. परंतु आता भारतानंदेखील आक्रमक होत चीनला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकताचं भारताचा एक गुप्तचर उपग्रह चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून गेला. या उपग्रहानं महत्त्वाची माहितीदेखील मिळवली आहे. परंतु याची खबर लागताचं चीनच्या पायाखालची जमीन मात्र सरकल्याचं दिसत आहे. आयएएनसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारताच्या डीआरडीओचा हा उपग्रह EMISAT इंटेलिजन्स इनपुट मिळवण्याचं काम करतो. यामध्ये ELINT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम कौटिल्य हे जोडण्यात आलेले आहे. याच्या मदतीनं संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची माहिती घेण्यास मदत मिळते. हा उपग्रह अरूणाचल प्रदेशनजीक असलेल्या तिबेटच्या त्या प्रदेशावरून गेला जो पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात आहे, अशी माहिती एका अधिकृत सूत्राकडून देण्यात आली.

रेडिओ सिग्नलचीही माहिती घेतो कौटिल्य

इस्रोनं तयार केलेल्या EMISAT चा ELINT सिस्टम शत्रूच्या क्षेत्रातील ट्रान्समिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या रेडिओ सिग्नलचीदेखील माहिती मिळवण्यास सक्षम आहे. लडाखमधील पँगाँग सो च्या फिंगर ४ बाबत भारत चीनदरम्यान अयशस्वी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी हा उपग्रह तिबेटवरून गेल्यानं चीनमध्ये एकच खळबळ माजली आहे. परंतु सध्या चीनकडून या वादावर चर्चा सुरू आहे.

पाकिस्तावरही नजर ठेवतो उपग्रह

यापूर्वी हा उपग्रहानं पाकिस्तानच्या नौदलाच्या ओर्मारा बेसवरूनही गेला होता. चीनच्या मदतीनं पाकिस्ताननं या ठिकाणी पाणबुड्या जमवल्याचंही म्हटलं जातं. सध्या एकीकडे चीनच्या कुरापती सुरू असल्या तरी दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापतीही थांबवण्याचं नाव घेत नसल्याचंही सध्या दिसून येत आहे.