भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना करोना महासाथीच्या काळात धक्का लागलेला नसून, ते पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. दोन्ही देश आता कोविडोत्तर काळात सहकार्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.

श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवर्धने यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, कोविडकाळात दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात जराही बाधा आली नसून, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये आभासी पातळीवर जी संयुक्त शिखर बैठक झाली ती याचे द्योतक आहे.

जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे समपदस्थ महिंदा राजपक्षे यांच्यात सप्टेंबरमध्ये शिखर बैठक झाली होती. आता आम्ही कोविडोत्तर काळात मैत्री वाढवण्यावर भर देत असून श्रीलंकेने भारताकडून लशी घ्याव्यात, असा सकारात्मक संदेश आम्ही देत आहोत.

जयशंकर हे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये शिखर बैठक झाल्यानंतर किमान तीन महिन्यांनी श्रीलंका दौऱ्यावर आले असून त्यात त्यांनी दहशतवादविरोधी सहकार्य, सागरी सुरक्षा, व्यापार व गुंतवणूक यावर भर दिला आहे. अल्पसंख्याक तमिळ समाजाच्या आशाआकांक्षांचा श्रीलंकेने विचार करावा असेही त्यांनी म्हटले आहे. भारत श्रीलंकेची एकता, स्थिरता, प्रादेशिक एकात्मता यासाठी वचनबद्ध आहे. श्रीलंकेतील सर्वसमावेशक राजकारणातील समेटाच्या प्रक्रियेला आमचा पाठिंबा आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.

जयशंकर यांनी अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे, परराष्ट्रमंत्री गुणवर्धने यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मत्स्यसंवर्धनमंत्री डग्लस देवानंद यांच्याशीही चर्चा केली. भारताच्या ज्या मच्छीमारांना श्रीलंकेने तुरुंगात ठेवले आहे त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांकडून प्रशंसा

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे चांगले राजनैतिक मुत्सद्दी असून त्यांनी परराष्ट्र खात्याचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करीत भारत-अमेरिका यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, अशा शब्दांत अमेरिकी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी जयशंकर यांची प्रशंसा केली. पॉम्पिओ यांनी ट्वीट संदेशात जयशंकर यांच्यासमवेतचे त्यांचे छायाचित्रही टाकले आहे. त्याच ट्वीट संदेशात त्यांनी जयशंकर यांचे आभार मानले आहेत.