भारत व श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे अध्यक्ष मैथिरपाला सिरीसेना यांच्यात चर्चा झाली. त्यात मच्छीमारांच्या प्रश्नावरही सकारात्मक व मानवी भूमिकेतून चर्चा झाली.
मोदी यांनी सिरीसेना यांच्यासमेवत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नागरी अणुकरारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याने परस्पर सामंजस्याचे दर्शन घडले आहे. श्रीलंकेबरोबर प्रथमच असा करार करण्यात आला. त्यामुळे सहकार्याची नवी दालने खुली झाली आहेत. कृषी व आरोग्य क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य करतील.
सिरीसेना हे रविवारी येथे आले व त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली.
किरणोत्सारी समस्थानिके, अणुसुरक्षा व प्रारण सुरक्षा, तसेच अणुसुरक्षा या क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. तसेच किरणोत्सारी कचऱ्याची विल्हेवाट व पर्यावरणाच्या प्रश्नावर श्रीलंकेला फायदा होणार आहे.
मच्छीमारांच्या सुटकेच्या प्रश्नाला श्रीलंकेच्या अध्यक्षांनी महत्त्व दिले असून दोन्ही देशाच्या लोकांना रोजीरोटी मिळाली पाहिजे व या प्रश्नात आपण सकारात्मक व मानवतावादी दृष्टिकोनातून लक्ष घालू, असे सिरीसेना यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांच्या मच्छीमार संघटना लवकरच भेटणार असून त्यांच्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यास मदत होईल, असे मोदी यांनी सांगितले.