भारताचे स्पष्टीकरण *   देशभरात विविध संघटनांकडून निदर्शने
भारतीय हद्दीत घुसून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या आगळिकीवरून संसदेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात जुंपलेली असतानाच पाकिस्तानी लष्कराने बुधवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत ऊरी भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करी तुकडय़ांवर गोळीबार केला. भारतानेही त्यास चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने तब्बल एक तास गोळीबार सुरू होता. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानच्या आगळिकीनंतरही द्विपक्षीय चर्चा सुरूच राहील, असे बुधवारी भारताकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मंगळवारच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पाचही जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आले. तत्पूर्वी लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी सर्व शहिदांना मानवंदना दिली.
पँूछ भागातील चाकन-दा-बाग या ठिकाणी गस्तीवर असलेल्या जवानांवर मंगळवारी पहाटे पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटले. संसदेतही विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसला धारेवर धरले. बुधवारीही संसदेत याच मुद्दय़ावरून गदारोळ झाला. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी हल्ल्याबाबत केलेल्या विधानांवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी त्यांच्याकडून माफीची मागणी केली.
मदत नाकारली
या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीने बुधवारी बिहार सरकारडून दिलेली मदत नाकारली आहे. मला कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई नको तर पाकिस्तानविरोधात कठोर लष्करी कारवाई करा, असा आक्रोश विजय राय या शहीद जवानाची पत्नी पुष्पा राय हिने केला आहे.
 पाटण्यापासून ५० किमी अंतरावर असणाऱ्या भिता या खेडय़ात राहत असलेल्या पुष्पा राय हिला बिहार सरकारने १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत घेण्यास त्यांनी नकार दिला.
शहिदांना मानवंदना
दरम्यान, मंगळवारच्या हल्ल्यातील शहिदांना लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी अखेरची मानवंदना दिली. सिंग यांनी बुधवारी पूँछ भागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जवान व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.

शोकसंतप्त परिवार
बिहार रेजिमेंटच्या चारही जवानांच्या हौतात्म्याच्या वृत्ताने संबंधित शहिदांच्या मूळ गावांवर शोककळा पसरली. बुधवारी रात्री उशिरा सर्व शहिदांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले.
शहीद झालेल्या जवानांपैकी विजयकुमार राय हे पाटण्याच्या ग्रामीण या भागातील आहेत. शंभुशरण सिंग हे भोजपूर जिल्हय़ातील, तर प्रेमनाथ सिंग व रघुनंदन प्रसाद हे सारण जिल्हय़ातील आहेत. या जवानांच्या बलिदानानंतर स्थानिक नागरिकांत संतापाची भावना असून पाकिस्तानच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जावे, अशी त्यांची भावना आहे.
विजयकुमार राय यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. गेल्याच महिन्यात विजयकुमार यांनी आईच्या डोळ्यांवर उपचार करून घेतले होते. नायक शंभुसरण सिंग यांचे आजोबा हरिहर राय हे बिहार पोलीस दलातून निवृत्त झाले असून त्यांचे वडील बनीधर राय हे शेतकरी आहेत. त्यांचे दोन भाऊ लष्करात आहेत, एक बिहार पोलिसात आहे. सिंग यांचा विवाह २००१ मध्ये स्वप्नादेवी यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. समौता येथील प्रेमनाथ सिंग व एकमा येथील रघुनंदन सिंग या दोन सुपुत्रांच्या वीरमरणाने छाप्रा शहर सुन्न झाले आहे. प्रेमनाथ सिंग यांचे वडील निवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत व ते चार भावांपैकी मोठे व कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी संगीतादेवी, दोन मुली व एक मुलगा आहे. रघुनंदन प्रसाद एकमा भागातील माने गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील अशोक कुमार प्रसाद हे लष्करात होते.