भारताप्रमाणे अन्य शेजारचे देशही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. भारताने या देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. साऊथ ब्लॉकमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेने याच औषधाच्या निर्यातीसाठी भारतावर दबाव टाकला होता.

भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.

अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आखाती देशांना औषधांची कितपत गरज आहे, त्यावरही भारताचे लक्ष आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आखाती देशांच्या संपर्कात आहेत. “इंडो-पॅसिफिक देशांबरोबर अमेरिका, फ्रान्स, स्पेन, यूके आणि इटली या देशांबरोबरही आपण संपर्कात आहोत” असे या अधिकाऱ्याने सांगितले.