भारत हा हिंदू राष्ट्रच असून भाषा, धर्म, राहणीमान आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही हिंदुत्वामुळेच भारत एकसंध आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे. भारत पाकिस्तानला शत्रू मानत नाही. पण पाकिस्तानने अद्याप भारताबाबतची भूमिका बदलली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुवाहाटीत रविवारी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, भारताने पाकिस्तानला शत्रू मानणे कधीच बंद केले. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानने अजूनही भारताबाबतची भूमिका बदलली नाही. हडप्पा, मोहंजोदारो आता पाकिस्तानमध्ये असले तो भारताचाच एक भाग आहे. पण पाकने हे कधी स्वीकारलेच नाही.पाकने हिंदुत्व स्वीकारले नाही आणि म्हणून तो वेगळा देश झाला, असे त्यांनी नमूद केले. बांगलादेशबाबतही त्यांनी हीच भूमिका मांडली. बांगलादेशमध्येही बंगाली भाषा बोलणारे अनेक जण आहे. मात्र तरी देखील तो स्वतंत्र देश का?, कारण त्यांनी देखील हिंदुत्व स्वीकारले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदुत्वात विविधतेला स्थान आहे. मात्र विभाजनाला स्थान नाही. म्हणूनच भारत हा हिंदू राष्ट्र आहे, असे त्यांनी सांगितले.

संघाच्या उत्तर आसाम विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अन्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्रिपुरा, मेघालय व नागालँड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपने ईशान्येकडील राज्यांकडे लक्षकेंद्रीत केले आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.