पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाल्यानंतर भारताने अवघ्या १२ दिवसांमध्ये पाकिस्तानला जोदरात उत्तर दिले आहे. बालाकोट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात मिराज-२०० विमानांनी १००० किलो वजनाचे बॉम्ब जैश ए मोहम्मदच्या तळांवर फेकले. या हल्ल्यामध्ये सहभागी झालेल्या मिराज-२०० विमाने ही मागील दोन वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या आणि आगरा लखनऊ द्रुतगती महामार्गावर उतरवण्याची प्रात्यक्षिक पाहायला मिळाली होती. उत्तर प्रदेशमधील नव्या महामार्गच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी लढाऊ विमाने महामार्गावर उतरुन पुन्हा उड्डाण करताना दिसली होती. जाणून घेऊयात याच विमानांची निवड का करण्यात आली आणि काय आहे त्यांचे वैशिष्ट्ये…

फ्रान्सच्या दसाँ एव्हिएशन कंपनीने १९७०च्या दशकात विकसित केलेले मिराज-२००० हे बहुउद्देशीय लढाऊ विमान (मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट) जगातील अत्याधुनिक आणि आघाडीच्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते. अमेरिकेच्या एफ-१५ आणि एफ-१६ या विमानांच्या तोडीची मोजकीच विमाने जगात आहेत. त्यात फ्रान्सचे मिराज-२००० आणि राफेल, युरोपीय देशांनी एकत्रितपणे विकसित केलेली युरोफायटर टायफून आणि टॉरनॅडो, रशियन मिग-२९ आणि सुखोई-२७/३०, स्वीडनचे ग्रिपेन या विमानांचा समावेश होतो.

दसाँ कंपनीची मिराज-एफ१ आणि मिराज-३ ही विमाने १९६० आणि १९७०च्या दशकांत जगभरात प्रसिद्ध होती. ही विमाने जुनी झाल्यानंतर त्यांना बदलण्यासाठी फ्रान्सने मिराज-२००० विमानाची रचना केली. त्याच्या पहिल्या प्रारूपाचे उड्डाण १९७८ मध्ये झाले आणि १९८३ पासून मिराज-२००० फ्रेंच हवाई दलात सामील होण्यास प्रारंभ झाला. मिराज-२००० विमानांनी फ्रान्सला पुन्हा जागतिक विमान उद्योगात आघाडी मिळवून दिली. मिराज-२००० हे वजनाला हलके, आकाराने आटोपशीर, वेगवान, चपळ आणि संहारक लढाऊ विमान आहे. त्याला शेपटाकडील लहान पंख (टेल विंग्ज) नाहीत. त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) हे मिराज-२०००चे वैशिष्टय़. त्यामुळे त्याला वेगाने हवाई कसरती किंवा डावपेच करण्यास मदत मिळते. त्याची स्नेक्मा एम-५३ पी-२ टबरेफॅन इंजिने ब्रिटिश आणि अमेरिकी जेट इंजिनांपेक्षा वजनाला हलकी, सुटसुटीत आणि प्रभावी आहेत. त्याने मिराज-२००० विमानांना ताशी कमाल २३३८ किमी इतका वेग मिळतो. त्याचा पल्ला १८५० किमी आहे. ते एका मिनिटात ५६,००० फूट उंची गाठते.

मिराजवरील शक्तिशाली डॉप्लर रडार एका वेळी २४ लक्ष्यांचा माग काढू शकते. रडारची ‘लुक डाऊन, शूट डाऊन’ क्षमता विमानाखालील हवेतील लक्ष्ये टिपण्यास मदत करते. मिराज-२००० वर दोन ३० मिमी व्यासाच्या कॅनन, ६३०० किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची सोय आहे. मिराजवरून अण्वस्त्रांसह, लेझर गायडेड बॉम्ब, स्मार्ट बॉम्ब, मात्रा मॅजिक आणि मायका ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि एक्झोसेट ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागता येतात. मिराज-२००० विमानांनी बोस्निया आणि कोसोवो संघर्षांत भाग घेतला होता. भारतीय हवाई दलातील मिराज-२००० (वज्र) विमाने कारगिल युद्धात वापरली गेली.

(सौजन्य: सचिन दिवाण, गाथा शस्त्रांची सदर)