पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या या अरुणाचल भेटीवर चीनने आक्षेप घेत निषेध नोंदवला. चीनच्या या विरोधाला भारतानेही तितकेच सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असून आतापर्यंत अनेकवेळा चीनला ही गोष्ट सांगितली आहे. भारतीय नेते ज्या प्रमाणे अन्य प्रदेशांचे दौरे करतात तसेच वेळोवेळी ते अरुणाचल प्रदेशमध्ये येत असतात. आतापर्यंत अनेकवेळा अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग असल्याचे चीनला स्पष्ट केले आहे असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

अरुणाचल प्रदेशला आम्ही कधीही मान्यता देणार नाही. सीमा प्रश्न अधिक जटिल होईल अशा गोष्टींपासून भारतीय नेत्यांनी दूर राहिले पाहिजे असे चीनने म्हटले आहे. अलीकडे भारत-चीनमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न झाला असला तरी दोन्ही देशांमध्ये सीमावाद मिटलेला नाही. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा हिस्सा मानतो.

पंतप्रधान मोदींनी शनिवारी अरुणाचल दौऱ्यात काही विकासकामांचे उद्घाटन केले तर ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे भूमिपूजन केले. सीमावर्ती राज्यांना जोडण्यासाठी आपले सरकार प्राधान्य देत असल्याचे मोदींनी सांगितले. अरुणाचलमध्ये महामार्ग, रेल्वे, हवाईमार्ग आणि ऊर्जा स्थिती सुधारण्याला आपले सरकार महत्व देत असल्याचे मोदींनी सांगितले. यापूर्वीच्या सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदींनी केला.