भारतीय लष्कराने चीनला ठोस  उत्तर दिले असून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला अनपेक्षित परिणामांना तोंड द्यावे लागत आहे, असे मत भारताचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केले आहे. भारताची भूमिका नि:संदिग्ध असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत बदल आम्ही मान्य करणार नाही,असेही त्यांनी बजावले आहे.

आभासी संवादात त्यांनी सांगितले, की पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. पण भारताची भूमिका नि:संदिग्ध व कणखर असून पूर्व लडाखमध्ये चीनच्या दु:साहसाला  भारतीय सैन्याने ठोस उत्तर दिले. चीनला अनपेक्षित परिस्थितीस तोंड द्यावे लागत आहे कारण त्यांना भारत असे ठोस उत्तर देईल याचा अंदाज नव्हता.  या मोठय़ा संघर्षांच्या काळात ताणतणाव, अतिक्रमण, काही लष्करी कृती घडण्याची शक्यता असते.

संरक्षण प्रमुख रावत यांनी सांगितले, की सीमेपलीकडून पाकिस्तान दहशतवाद पसरवत असला तरी त्याला भारतीय लष्करी दले ठोस उत्तर देत आहेत. सुरक्षा आव्हानांच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले, की पाकिस्तान आणि चीन या दोन अण्वस्त्रसज्ज देशांबरोबरच्या संघर्षांमुळे प्रादेशिक अस्थिरता वाढत  आहे.  या दोन देशांबरोबर भारताचे युद्ध यापूर्वी झालेले आहे.  हे दोन देश एकमेकांच्या मदतीने भारताच्या विरोधात कृती करीत आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानने छुपे युद्ध लादले असून त्यामुळे दोन्ही देशातील  संबंध कधी नव्हे इतके बिघडले आहेत.

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की उरी हल्ला, बालाकोट येथील हवाई हल्लय़ातून भारताने पाकिस्तानला ठोस उत्तर दिले आहे. त्यामुळे सहजपणे भारतात दहशतवादी घुसवता येणार नाहीत असा संदेश पाकिस्तानला मिळाला आहे यात शंका नाही. दहशतवादाविरोधात भारताने जे धोरण राबवले आहे त्यामुळे पाकिस्तानात संदिग्धता व अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारत दहशतवादाची समस्या कठोरपणे हाताळत आहे. खालावलेली अर्थव्यवस्था,  नागरी—लष्करी संघर्ष या परिस्थितीतही पाकिस्तान त्यांचा काश्मीरबाबतचा अयशस्वी प्रयत्न पुढे  रेटत आहे. पाकिस्तानी लष्कर हे भारतापासून धोका असल्याचे सांगून आपल्या युद्धक्षमता वाढवण्याचे कारण देत निधीची मागणी करीत आहे.

भारत-चीन चर्चेची आठवी फेरी

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील संघर्षांच्या ठिकाणांवरून सैन्य माघारी घेण्याबाबतचे सूत्र ठरविण्याच्या उद्देशाने शुक्रवारी भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावर चर्चा झाली, असे सूत्रांनी सांगितले. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीतील चुशूल येथे भारत आणि चीन यांच्यातील उच्चस्तरीय लष्करी स्तरावरील चर्चेच्या आठव्या फेरीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत भारताच्या उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनी अनेकदा बैठका घेतल्या आणि पूर्व लडाखमधील एकूण स्थितीचा आढावा घेतला. भारत आणि चीन यांच्यातील चर्चेची सातवी फेरी १२ ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यावेळी पांगाँग सरोवर परिसरातील मोक्याच्या ठिकाणांहून भारताने सैन्य मागे घ्यावे असा चीनने आग्रह धरला होता. तथापि, संघर्षांच्या सर्व ठिकाणांहून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली पाहिजे, असे भारताने स्पष्ट केले होते.

लष्करप्रमुख नरवणे यांची नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा

काठमांडू : लष्करप्रमुख जन. मनोज नरवणे यांनी शुक्रवारी नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली, असे येथे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओली हे नेपाळचे संरक्षणमंत्रीही आहेत, दोघांची भेट पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी झाली.