जगभरातील परिस्थितीचा विचार करता भारत अंतर्गत दहशतवादाच्या समस्येपासून जवळपास मुक्त आहे. देशातील नागरिकांची पारंपारिक विचारसरणी आणि वैविध्यतेवर असलेली श्रद्धा यामुळे हे शक्य झाले आहे, असे मत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष वर्गात बोलत होते.
निधर्मीपणा हा भारतीयांच्या जगण्याचा एक भाग आहे. भारताने दहशतवादाचे चटके सोसले आहेत, यामध्ये सीमेपलेकडील दहशतवादाचाही समावेश आहे. भारताने अंगिकारलेल्या धोरणांमुळे आणि प्रशासकांच्या दूरदृष्टीमुळे भारतात देशांतर्गत दहशतवादाची पाळेमुळे पसरू शकली नाहीत, असे प्रणब मुखर्जी यांनी सांगितले. आपण नेहमीच सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य राहिलो आहोत. अंतर्गत दहशतवादामुळे आपले फारसे नुकसान झालेले नाही. जनतेची पारंपारिक विचारसरणी आणि भाषा आणि खाण्यापिण्यासह अनेक गोष्टींतील वैविध्यतेवर असणारी लोकांची श्रद्धा आणि विश्वास यामुळे हे शक्य झाले आहे. आपण एकाच व्यवस्थेचा भाग आहोत. ही विलक्षण गोष्ट आहे, असे प्रणब मुखर्जी यांनी म्हटले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 5:57 pm