भारतानं आज अग्नी 2 या अण्वस्त्र वाहण्याची क्षमता असलेल्या मध्यम वर्गात मोडणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. ओदिशामधल्या एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मंगळवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे. इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्प्लेक्स 4 मधून मोबाइल लाँचरच्या माध्यमातून अग्नी 2 ची चाचणी घेण्यात आली.

अग्नी 2 क्षेपणास्त्र 20 मीटर लांबीचे असून त्याचे वजन 17 टन आहे. तसेच एक टन इतकी वहनक्षमता असलेल्या अग्नी 2 चा माऱ्याचा पल्ला दोन हजार किमी इतका आहे. भारताचे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा डीआरडीओनं विकसित केलेल्या अग्नी या सीरीजमधलंच हे क्षेपणास्त्र आहे. या सीरीजमध्ये अग्नी 1 (700 किमीचा पल्ला), अग्नी 3 (3000 किमीचा पल्ला), अग्नी 4 (4000 किमीचा पल्ला) व अग्नी 5 (5000 किमीपेक्षा जाल्त पल्ला) यांचा समावेश आहे.

हे क्षेपणास्त्र याआधीच लष्करामध्ये सामील झाले असून अत्यंत आधुनिक अशा यंत्रणेनं सज्ज आहे. पंधराच दिवसांपूर्वी भारतानं पृथ्वी 2 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्यात आता अग्नी 2 ती भर पडली आहे.