ब्रिटनमध्ये आढळून आलेला करोना विषाणूचा नवा प्रकार भारतातही पोहोचला. मात्र, भारत या नव्या विषाणूच्या संसर्गावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवत आहे. यासाठी आपली आयसोलेशन प्रक्रिया दुसऱ्या देशांपेक्षा जास्त प्रभावी ठरत असल्याचा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केला आहे.

आयसीएमआरनं म्हटलं की, “संपूर्ण जगभरात करोनाचा नव्या प्रकार शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये सातत्याने संशोधन सुरु आहे. ब्रिटनहून भारतात आलेल्या लोकांच्या नमुन्यांमधून पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीत (एनआयव्ही) शोध घेतला जात आहे. आजवर कोणत्याही देशानं करोनाच्या नव्या प्रकारावर यशस्वीरित्या आयसोलेशन सुविधा तयार केलेली नाही. मात्र, भारत यामध्ये यशस्वी झाला आहे”

आयसीएमआर आणि एनआयव्हीतील वैज्ञानिक करोनाच्या नव्या प्रकाराचा शोध घेण्याबरोबर याचा संसर्ग वाढण्यापासून रोखण्याकरिता विरो सेल लाईनचा वापर करत आहेत. आयसीएमआरने नुकतचं म्हटलं होतं की, भारतात करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, येत्या काळात करोनाचा नवा विषाणू आपल्याकडे देखील आढळून येऊ शकतो.

नव्या विषाणूचा संसर्ग वाढल्यास लसही होऊ शकते प्रभावहीन

आयसीएमआरच्या पदाधिकारी डॉ. सिमरन पांडा यांनी म्हटलं होतं की, “दक्षिण अफ्रिका आणि ब्रिटनच्या करोनाच्या म्युटेशनच्या संक्रमणात थोडासा बदल आढळून आला आहे. तांत्रिक भाषेत याला ‘ड्रिफ्ट’ असं म्हटलं जातं. यावर चिंता व्यक्त करताना त्यांनी म्हटलं होतं की, “जर भारतातही नव्या विषाणूचा संसर्ग वाढला तर लसही यावर प्रभावहीन ठरेल. पण विषाणूमध्ये छोटासाच बदल दिसून येत असल्याने लस आणि इलाज दोन्ही प्रभावी ठरणार आहेत.