भारताने शुक्रवारी स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राची चंडिपूर येथे एकात्मिक चाचणी क्षेत्र संकुलात चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने वैमानिकरहित विमानाचे लक्ष्य अचूक भेदले असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. सकाळी ११.२२ वाजता संकुल तीन येथून आकाशचे प्रक्षेपण झाले, येत्या काही दिवसांत या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. सागरावर एका विशिष्ट उंचीवरून उडत असलेल्या वैमानिकरहित विमानास या चाचणीत लक्ष्य करण्यात आले.
आकाश हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केले आहे. ६० किलोचे अस्त्र घेऊन २५ कि.मी.पर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असून तीस कि.मी. अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदण्याची त्याची क्षमता आहे. त्यात एक बॅटरी असून तिच्या मदतीने लक्ष्ये शोधली जाऊन ती एकाच वेळी उडवली जाऊ शकतात. लढाऊ जेट, क्रूझ क्षेपणास्त्रे. हवेतून-जमिनीकडे येणारी क्षेपणास्त्रे यांचा मुकाबला करण्याची क्षमता त्यात आहे. संरक्षणतज्ज्ञ त्याची तुलना एमआयएम १०४ पॅट्रिऑट या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासारखे आहे. त्याची शेवटची चाचणी ६ जून २०१२ मध्ये याच तळावर करण्यात आली होती.

आकाश क्षेपणास्त्र
* जमिनीवरून हवेत मारा.
* तुलना- अमेरिकेचे एमआयएम १०४ पॅट्रिऑट क्षेपणास्त्र.
* क्षमता- ६० किलोचे अस्त्र ३० कि.मी.पर्यंत नेऊ शकते.
* वैशिष्टय़- एकाच वेळी अधिक लक्ष्ये भेदण्याची क्षमता.