भारताकडून बुधवारी स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राचे आज ओडिशातील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (आयटीआर) तळ क्रमांक ३ येथून दूरप्रक्षेपकाच्या (मोबाईल लाँचिंग) साह्याने सकाळी ९.४० वाजता प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
पृथ्वी-२ च्या आज दोन चाचण्या घेण्यात येणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे दुसरी चाचणी रद्द करण्यात आली. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ मध्ये अशाप्रकारची दुहेरी चाचणी घेण्यात आली होती आणि ती यशस्वीही ठरली होती.
पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० कि.मी. इतका असून यामध्ये ५०० ते १००० किलो अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. याशिवाय, त्याच्या दोन इंजिनांमध्ये द्रव इंधनाचा वापर करण्यात आला आहे. लक्ष्य शोधण्यासाठी या क्षेपणास्त्रात प्रगत दिशादर्शन प्रणालीचा वापर केलेला आहे.
२००३ साली भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘पृथ्वी-२’ हे भारताच्या प्रतिष्ठित अशा एकात्मिक दिशादर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (आयजीएमडीपी) डीआरडीओने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची यापूर्वीची चाचणी याच टेस्ट रेंजमध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आली होती.