स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची चाचणी मंगळवारी येथे घेण्यात आली. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० किलोमीटर आहे व त्याची क्षमता एक हजार किलो वजनाचे अण्वस्त्र किंवा इतर अस्त्र वाहून नेण्याची आहे. लष्कराने घेतलेली ही उपयोजन चाचणी होती. या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली आहे असे एकात्मिक चाचणी क्षेत्राचे संचालक एम व्ही के व्ही प्रसाद यांनी सांगितले.
स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या वतीने ही चाचणी संकुल क्रमांक तीनमध्ये घेण्यात आली. चंडीपूर येथे चलत प्रक्षेपकावरून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. उत्पाति क्षेपणास्त्रांमधून अंदाजाने एक क्षेपणास्त्र उचलून सकाळी ९.४८ वाजता ही चाचणी घेण्यात आली असून या वेळी संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे वैज्ञानिक उपस्थित होते. या क्षेपणास्त्राच्या मार्गाचा मागोवा रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिं ग सिस्टीम व टेलेमेट्री स्टेशनच्या वतीने घेण्यात आला.  
पृथ्वी क्षेपणास्त्र हे २००३ मध्ये लष्करात तैनात केले असून त्याची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संस्थेने केली आहे. हे प्रक्षेपण हा नेहमीच्या सरावाचा भाग होता असेही सांगण्यात आले. वेळोवेळी अशा चाचण्या घेतल्याने भारताच्या शस्त्रसाठय़ातील या क्षेपणास्त्रांची सज्जता सिद्ध होत असते. ३ डिसेंबर २०१३ रोजी अशाच प्रकारे पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी रीत्या घेण्यात आली.
वैशिष्टय़े
* अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र
* वजन वहन क्षमता ५०० ते १००० किलो
* पल्ला ३५० किलोमीटपर्यंत