भारताची नेपाळला सूचना

नेपाळमध्ये सध्या सुरू असलेली घटनाविरोधी आंदोलने राजकीय स्वरूपाची असून त्यामुळे उत्पन्न झालेल्या अशांततेच्या समस्येवर विश्वासार्ह आणि परिणामकारक पद्धतीने तोडगा काढावा, अशी सूचना भारताने नेपाळ सरकारला केली आहे. मतभिन्नतेच्या मुद्दय़ावर लवकरच तोडगा निघेल, अशीही आशा भारताने व्यक्त केली.
नेपाळमधील समस्या राजकीय स्वरूपाची असून सध्या निर्माण झालेला संघर्षांत्मक पेचप्रसंग विश्वासार्ह तसेच परिणामकारकरीत्या सोडवावा, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने केले.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तेरई भागात भारतीय वंशाचे माधेसीस जातीचे लोक राहात असून नेपाळमध्ये अलीकडेच झालेली घटनादुरुस्ती त्यांना मान्य नाही. या दुरुस्तीमुळे आपल्याविरोधात भेदभाव करण्यात आल्याचा या लोकांचा आरोप आहे. त्यामुळे या घटनादुरुस्तीविरोधात त्यांनी हिंसक आंदोलन सुरू केले आहे. सदर घटनादुरुस्तीमुळे देशाचे सात राज्यांमध्ये विभाजन करण्यात येणार असून त्याविरोधात माधेसी व थारू वांशिक गटाच्या लोकांनी गेल्या महिनाभराहून अधिक काळ आंदोलन आरंभले असून त्यामध्ये ४०हून अधिक लोक ठार झाले आहेत. या आंदोलनामुळे नेपाळमध्ये साखर, मीठ, अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
या अशांततेमुळे नेपाळमध्ये फिरताना आपल्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्याची तक्रार भारताचे मालवाहतूकदार तसेच अन्य वाहतूकदारांनी केली असल्याचे नेपाळ सरकारने एका निवेदनाद्वारे या आठवडय़ाच्या प्रारंभी जाहीर केले होते. त्याच पाश्र्वभूमीवर नेपाळमध्ये सातत्याने सुरू असलेल्या िहसाचाराबद्दल भारत तीव्र चिंता व्यक्त करीत आहे.