मुंबई हल्ल्याची पाकिस्तानच्या न्यायालयात होत असलेली सुनावणी वारंवार लांबणीवर टाकली जात असल्याबद्दल भारताने शुक्रवारी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून निषेध व्यक्त केला. त्याच वेळी पाकिस्तानातही भारतीय उप उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील परराष्ट्र कार्यालयात जाऊन निषेध व्यक्त केला.
माहीतगार सूत्रांनी सांगितले, की भारतीय अधिकाऱ्यांनी नवी दिल्ली व इस्लामाबाद येथे पाकिस्तानी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यात पाकिस्तानकडून मुंबई हल्ल्याच्या खटल्याबाबत प्रगतीची विचारणा केली.
भारतीय अधिकाऱ्यांनी या बैठकीत २००८च्या मुंबई हल्ल्याच्या पाकिस्तानातील सुनावणीस महत्त्व दिल्याचे समजते. या हल्ल्यात किमान १६६ लोक मारले गेले होते.
लागोपाठ सातव्यांदा पाकिस्तानी न्यायालयाने मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी बुधवारी तहकूब केली होती.
 या प्रकरणाची शेवटची सुनावणी २५ जूनला होणार होती, पण न्यायमूर्ती रजेवर असल्याने ती होऊ शकली नाही. या खटल्यात एकूण सात आरोपी असून, त्याची सुनावणी नियमितपणे झालेली नाही, कारण फिर्यादी पक्षाचे वकीलच उपस्थित राहात नाहीत.
 मे २८, जून ४, जून १८, जुलै २ रोजीच्या सुनावणीस फिर्यादी पक्षाचे वकील सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थित राहिले नव्हते.
 लष्कर-ए-तय्यबाचा ऑपरेशन्स कमांडर झकिउर रेहमान लखवी, अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद, अंजुम हे आरोपी असून त्यांच्यावर हल्ल्याचे नियोजन, वित्तपुरवठा व भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर प्रत्यक्ष हल्ला घडवून आणणे, तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कटात सामील होणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत.