करोनानं शिरकाव केल्यानंतर भारतात पीपीई किटचा प्रचंड तुटवडा होता. सुरूवातीच्या काळात वैद्यकीय उपकरणांसाठी भारताला दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं. मात्र, या संकटाला संधी मानत भारतानं आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. जुलैमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर भारताने अमेरिकेसह अन्य पाच देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

करोनासंबंधित वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीच्या दिशेनं भारत वाटचाल करत आहे. जुलैमध्ये भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती तसेच सेनेगल आणि स्लोवानिया या देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. आरोग्य़ मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. जागतिक बाजारपेठेत पीपीई कीटच्या निर्यातीमुळे भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

याच काळात केंद्र सरकारने राज्य सरकार तसेत केंद्रशासित प्रदेशात देखील पीपीई किट, एन-९५ मास्कचा मोफत पुरवठा केला आहे.

मार्च ते ऑगस्ट २०२० च्या कालावधीत केंद्र सरकारनं स्वतःच्या बजेटमधून १.४० कोटी पीपीई किटची निर्मिती केली. याच काळात राज्यांना १.२८ कोटी पीपीई किटचा मोफत पुरवठा करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

करोना महामारीच्या सुरूवातीच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांचा जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण झाला होता. पीपीई किट्स, एन-९५ मास्क यासारखी बहुतेक साधनं ही भारतात तयार होत नव्हती. त्यामुळे भारताला त्याची आयात करावी लागत होती. जगभरात करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे या उपकरणांची मागणी वाढत गेली. त्यामुळे त्यांची जागतिक बाजारपेठेत देखील कमतरता भासू लागली होती.

या महामारीतही संधी शोधत वैद्यकीय उपकरणाच्या उत्पादनासाठी देशांतर्गत बाजारपेठ विकसित करण्याच्या निर्णय भारत सरकारने घेतला. आरोग्य, वस्त्रोद्योग, औषधनिर्माण मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, संरक्षण संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारताने स्वतःची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.