अफगाणिस्तानवर ‘लादण्यात’ आलेल्या दहशतवादाविरोधात त्या देशाचा लढा सुरू असून त्या लढय़ास भारताचा पाठिंबा असल्याचे आश्वासन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. अफगाणिस्तानसमवेत असलेल्या संबंधांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.

अपगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांचे मोदी यांनी स्वागत केले. अफगाणिस्तान सरकार आणि तेथील जनतेला भारताचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मोदी म्हणाले. रब्बानी यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना अफगाणिस्तानातील स्थितीची माहिती दिली. रब्बानी दुसऱ्या भारत-अफगाणिस्तान परस्पर सहकार्य परिषदेला हजर राहण्यासाठी भारतात आले आहेत.

त्यापूर्वी परिषदेत रब्बानी म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानने सुरक्षा सहकार्य अधिकाधिक बळकट करण्याचे ठरविले आहे. अफगाणिस्तान राष्ट्रीय संरक्षण दलास सहकार्य करण्याचेही भारताने मान्य केले आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत रब्बानी यांनी, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांबाबत भाष्य केले आणि या संघटनांमुळे प्रादेशिक स्थैर्याला धोका असल्याचे सांगितले. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सोमवारी चार करार करण्यात आले असून त्यामध्ये मोटर वाहन कराराचा समावेश आहे. दोन्ही देश ११६ विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणार आहेत आणि त्यामुळे सामाजिक-आर्थिक आणि पायाभूत विकास वेगाने होईल, असे या वेळी स्वराज म्हणाल्या.