पाकिस्तानातील बालकोट सेक्टरमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात इंडियन एअर फोर्सच्या मिराज २००० विमानांनी निर्णायक भूमिका बजावली. अत्यंत अचूक हल्ला करुन या फायटर विमानांनी पुलवामा हल्ल्याचा हिशोब चुकता केला. आज ३५ वर्षानंतरही मिराज २००० विमानांनी आपली घातक क्षमता सिद्ध केली आहे. पाकिस्तानने अमेरिकेकडून एफ-१६ फायटर विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८४ साली फ्रान्सबरोबर ४९ मिराज २००० विमाने खरेदी करण्याचा करार केला होता.

राफेलची बांधणी करणाऱ्या फ्रान्सच्या डासू कंपनीनेच मिराज-२००० विमानांची निर्मिती केली आहे. आज ही विमाने भारतीय हवाई दलाचा कणा आहेत. १९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी उंच शिखरांवर दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानी घुसखोरांवर लेझर गाईडेड बॉम्ब हल्ला करण्यासाठी मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला होता.

२००४ साली एअर फोर्सने आणखी १० मिराज २००० विमाने विकत घेतली. ग्वालियरमध्ये या विमानांचा मुख्य तळ आहे. मिसाइल, बॉम्ब बरोबरच मिराज २००० हे २० किलोटॉन अणूबॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहे. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर १५ किलोटॉन अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. एअरफोर्सकडे असलेल्या मिराज २००० विमानातील आज ८० टक्के विमान उड्डाण अवस्थेत आहेत.

रशियाकडून विकत घेतलेल्या अत्याधुनिक सुखोई-३० एमकेआयमधील फक्त ६० टक्के विमाने उड्डण अवस्थेत आहेत. सध्या ताफ्यात असलेल्या ४९ मिराज विमानांच्या कॉकपीट, रडार, आणि मिसाइल सिस्टिममध्ये सुधारणा करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर १७,५४७ कोटींचा करार केला आहे. सुधारणा आणि आयुष्य वाढवल्यामुळे मिराज २००० विमाने २०४० पर्यंत भारतीय हवाई दलाच्या सेवेत राहू शकतात.