इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालाकोट येथील जैशचा तळ उडवून पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानचे पोकळ दावे उघडे पडले आहेत. पाकिस्तानकडून सज्ज असल्याचे जे दावे करण्यात येत होते. त्याच्या पुरत्या चिंधडया उडाल्या आहेत. मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास एअर फोर्सच्या ‘मिराज’ फायटर विमानांनी हा हल्ला चढवला. या हल्ला होण्याआधी आम्ही पाकिस्तानी भूमीचे संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहोत.

हल्ला चढवला तर जशास तसे उत्तर देऊ असे पाकिस्तानाकडून पोकळ दावे करण्यात येत होते. सोमवारीच पाकिस्तानचे लष्कर आणि हवाई दलाची बैठक पार पडली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने विशेष संदेश प्रसारीत करुन भारताने हल्ला केला तर त्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत असे म्हटले होते.

पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि एअर चीफ मार्शल मुजाहीद अन्वर खान यांच्यात ही बैठक झाली होती. आम्हाला आमच्या तयारीवर, उत्तर देण्याच्या क्षमतेवर आणि सुसज्ज शस्त्रधारी लष्करावर पूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं होतं. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांची उड्डाण केल्याचही वृत्त होतं.

सीमेवर पाकिस्तानची फायटर विमाने तैनात होती. रडारही सज्ज होते. मात्र एवढे सर्व असूनही इंडियन एअर फोर्सने पीओकेमध्ये घुसून हा हल्ला करुन आपली क्षमता सिद्ध केली. एक प्रकारे पाकिस्तानकडून सज्जतेचे जे दावे करण्यात येत होते त्याच्या चिंधडया उडवल्या.