इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास नियंत्रण रेषा ओलांडून बालकोट सेक्टरमधील जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्धवस्त केले. एअरफोर्सच्या हल्ल्यात बालकोट, चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळ, लाँच पॅड नष्ट झाले आहेत. ही कारवाई करुन भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा हिशोब चुकता केला. जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.

भारताने या कारवाईच्यावेळी पाकिस्तानला दणका देण्यासाठी वापरलेली पाच शस्त्रे 

– हवाई हल्ल्यासाठी मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला. ग्वालियर येथील तळावरुन या फायटर जेटसनी उड्डाण केले. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या डासू कंपनीनेच या विमानांची निर्मिती केली आहे. १९८० च्या दशकात मिराज २००० विमाने इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाली.

– जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाईडेड बॉम्ब आहे. अचूक आणि नेमका हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.

– बॉम्बफेक करताना पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा सामना करण्यासाठी मॅट्रा मॅजिक क्लोज कॉम्बॅट मिसाइलही मिराजमध्ये बसवण्यात आले होते. मॅट्रा ही फ्रान्सची कंपनी आहे. एअर टू एअर लढाईसाठी हे मिसाइल वापरण्यात येते.

– लाइटनिंग पॉड – लक्ष्याचा माग काढून टार्गेटवर अचूक बॉम्ब फेक करण्यासाठी या लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील अत्याधुनिक हवाई दले या पॉडचा वापर करतात.

– भारताची बारा १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली त्यावेळी स्वदेशी बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग विमानाद्वारे बारा विमानांमध्ये समन्वय ठेवण्यात आला. नेत्र हे अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेले विमान आहे. हवाई हल्ल्याच्यावेळी योग्य समन्वय आणि टार्गेट हेरण्यासाठी मदत या विमानाने केली.