भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक २’ची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात होती. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने हा हल्ला केल्याचे भारतीय सैन्याने म्हटले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट सर्जिकल स्ट्राइकचे संकेत दिले होते. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा दिली जाईल. सैन्य दलाला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचे त्यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. पाकमधील बालाकोट येथील दहशतवादी संघटनांच्या तळांना हवाई दलाच्या विमानांनी लक्ष्य केले असून या तळांवर सुमारे २१ मिनिटे बॉम्बचा वर्षाव सुरु होता, असे समजते. या कारवाईनंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारवाईबाबतची माहिती दिल्याचे समजते. यानंतर बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन हे उपस्थित आहेत. या बैठकीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, पाकिस्तानमधील कारवाई आणि पुढील धोरण यासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.