पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए- मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केले. हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी सुमारे एक हजार किलोचे बॉम्ब जैशच्या तळांवर फेकले. या एअर स्ट्राइकमध्ये जैशचे तळ, कंट्रोल रुम पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे समजते. विशेष म्हणजे बालाकोट हे पाकिस्तानमधील खैबर- पख्तुनवा प्रांतात असून पहिल्यांदाच भारताने पाकव्याप्त काश्मीर ओलांडून थेट पाकच्या हद्दीत घुसून ही कारवाई केली आहे.

मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राइक केले. भारताच्या मिराज विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हे एअर स्ट्राइक केले आहे. भारताने उरीमधील हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर कारवाई केली होती. यंदा भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई केली आहे. बालाकोट हे सीमा रेषेजवळील परिसर असून २००५ मधील भूकंपात हा परिसर उद्ध्वस्त झाला होता.

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे ते ४० किलोमीटर आत गेले. बालाकोट हे अबोटाबादपासून ६२ किलोमीटर अंतरावर आहे. अबोटाबाद येथे एकेकाळचा जगातील मोस्ट वाँटेड दहशतवादी ओसामा बिन लादेन हा लपून बसला होता आणि अबोटाबादमध्येच अमेरिकी सैन्याने कारवाई करत लादेनला कंठस्नान घातले होते. कारगिलनंतर पहिल्यांदाच भारताच्या हवाई दलाने अशा प्रकारे पाकिस्तानवर हल्ला केला आहे. बालाकोट येथे जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचेही तळ आहे. या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, असे सूत्रांनी सांगितले.