पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या लष्करी कारवाईमध्ये ३८ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवितानाच पाकिस्तान लष्कराच्या बारा सैनिकांचाही खात्मा झाल्याची खात्रिशीर माहिती केंद्र सरकारच्या हाती आली आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा पन्नासवर पोचला आहे. दुसरीकडे या धाडसी कारवाईमध्ये एकाही भारतीय पॅरा कमांडोजला साधे खरचटलेसुद्धा नसल्याचा दावा विश्वसनीय सूत्रांनी केला.

‘चार ठिकाणच्या दहशतवादी अड्डय़ांवर (लाँचिंग पॅडस) किमान चाळीस दहशतवादी व पाकिस्तानी सैनिक असल्याची खात्रीशीर माहिती आमच्याकडे होती. मात्र, हल्लय़ानंतर गोळा केलेल्या तपशिलानुसार आमच्या हल्लय़ाचे शिकार झालेल्यांचा आकडा पन्नास आहे. त्यात ३८ दहशतवादी आणि बारा सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय २० जण जखमी झाल्याच्या माहितीची आम्ही आणखी खातरजमा करतो आहोत,’ अशी माहिती संरक्षण खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

याच मोहीमेमध्ये भारताचे १४ जवान मारल्याचा दावा बावचळलेल्या पाकिस्तानने गुरुवारी सायंकाळी केला होता. भारताने तो लगेचच फेटाळला. त्यासंदर्भात सूत्र म्हणाले, ‘ हा दावा पूर्णपणे खोटा आहे. लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी आहे. आपल्या एकाही कमांडोला साधे खरचटलेलेसुद्धा नाही. मोहीम संपवून आपल्या हद्दीत आल्यानंतर भूसुरुंगावर चुकून पाय पडल्याने एक कमांडोला किरकोळ दुखापत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

पाकिस्तानची दर्पोक्ती सुरूच

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने बुधवारी पहाटे दहशतवादी छावण्यांवर केलेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीचा आढावा घेण्यात आला. ‘कोणीही पाकिस्तानकडे वाकडय़ा नजरेने पाहू शकत नाही, परकीय आक्रमणाला तोडीस तोड उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत’, अशी दर्पोक्ती पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या बैठकीदरम्यान केली.

पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीज यांनी सांगितले की, काश्मिरी लोकांचा लढा हा पाकिस्तानसाठी प्रमुख अग्रक्रम आहे. त्यावर पाकिस्तान मागे हटणार नाही. काश्मीरमधील अत्याचारांवरून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष हटवण्यासाठी भारत वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे. पाकिस्तानने भारताशी राजनैतिक पातळीवर सामना केला पाहिजे पण आपली लष्करी दले देशाचे रक्षण करण्यास सुसज्ज असावीत. संरक्षण मंत्री ख्वाजा महंमद असीफ यांनी सांगितले की, पाकिस्तानला संघर्ष चिघळवण्यात फारसे स्वारस्य नाही पण कुठल्याही आव्हानास तोंड द्यायला आमचा देश तयार आहे. भारताचा दृष्टिकोन बेजबाबदारपणाचा असून तो देश तेथील लोकांच्या जनमताशी खेळ करीत असल्याचे असीफ म्हणाले.

 

देशभरात अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी हल्ले करण्याची भीती लक्षात घेऊन, असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सर्व संवेदनशील ठिकाणे, सामरिकदृष्टय़ा महत्त्वाची आस्थापने, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि इतर महत्त्वाच्या जागी जादा बळ तैनात करण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने राज्यांना केले असल्याचे एका अधिकृत सूत्राने सांगितले. विशेषत: महानगरांना अधिक खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू व काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्यांनाही दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय भूमीवर हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी यंत्रणा दहशतवादी गटांचा वापर  करू शकतील अशी शक्यता आहे.