लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यापासून देशात करोना बाधितांच्या संख्येत दिवसाला लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं असून, रविवारची आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी आहे. Covid19india.org या संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक करोना बाधित रुग्णांची संख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या आधी रशिया तिसऱ्या स्थानी होता. या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून, दुसऱ्या स्थानी ब्राझील आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत.

रविवारी भारताच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला. सर्वाधिक करोना बाधित रुग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला. भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. Covid19india.org च्या माहितीनुसार भारतातील रुग्णांची संख्या वाढून रविवारी ६ लाख ९० हजार ३९६ इतकी झाली. तर जॉन हॉपकिंन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रशियातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८० हजार २८२ इतकी झाली आहे.

सध्या अमेरिका २,८४४१,१२४ रुग्णसंख्येसह पहिल्या स्थानावर असून, ब्राझील १,५७७,००४ रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या अमेरिका व ब्राझीलमधील करोना बाधिताच्या रुग्णसंख्येत व भारतातील रुग्णसंख्ये मोठं अंतर असलं, तरी गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना बाधिता रुग्ण आढळून येण्याच प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. जून महिन्याच्या अखेरच्या १२ दिवसातच देशात २ लाख रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आकडेवारीनं भारताच्या चिंतेत भर टाकली आहे.

देशातील रुग्णांपैकी २ लाख फक्त महाराष्ट्रातील

देशातील एकूण रुग्णांपैकी २ लाखापेक्षा जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात रविवारी ६५५५ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या आता २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ३ हजार ६५८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ११ हजार ७४० रुग्ण आतापर्यंत करोनातून बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८६ हजार ४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.