अफगाणिस्तानात हजारो परदेशी योद्धे घुसले असून त्यांना सीमेपलीकडून पाठिंबा असल्यानेच तेथे प्रवेश करून ते हल्ले करीत आहेत, असा आरोप भारताने पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे केला आहे.
भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी सुरक्षा मंडळातील चर्चेत  सांगितले की, अफगाणिस्तान संसदेवर जो हल्ला करण्यात आला त्याचा भारत तीव्र निषेध करतो. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांनी म्हटल्याप्रमाणे अफगाणिस्तानात ७१८० परदेशी योद्धे (अतिरेकी) आहेत त्याची आम्हाला चिंता वाटते.
शेजारी देशाच्या (पाकिस्तान) पाठिंब्याशिवाय ते अफगाणिस्तानात येऊन हल्ले करू शकले नसते. संयुक्त राष्ट्र सरचिटणिसांच्या अहवालानुसार २०१४ मध्ये अफगाणिस्तानात सशस्त्र संघर्षांत ४५ टक्के वाढ झाली आहे. ७१ टक्के हिंसाचार हा दक्षिण व आग्नेय तसेच पूर्वेकडे झालेला आहे. या आकडय़ानुसार वांशिक विद्वेषातून हा संघर्ष चिघळवला जात असल्याचा आमचा संशय खरा ठरत
आहे.
अफगाणिस्तान संवेदनशील व ऐतिहासिक अशा स्थित्यंतराच्या नाजूक अवस्थेतून जात असताना तेथे हल्ले होत आहेत हे दुर्दैवी आहे अशी टीका त्यांनी केली. अफगाणिस्तानात सध्या अशरफ घनी हे अध्यक्ष, तर अब्दुल्ला अब्दुल्ला हे मुख्य कार्यकारी आहेत.