नवी दिल्ली : भारत व पाकिस्तान दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्स्प्रेसच्या प्रवाशांची संख्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अतिशय कमी झाल्यामुळे या रेल्वेगाडीचे आपल्या बाजूचे परिचालन स्थगित करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुढील नियोजित वेळापत्रकापासून ही गाडी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

१४ फेब्रुवारीला पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडी यामुळे दोन्ही देशांचे संबंध तणावाचे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने यापूर्वीच त्याच्या बाजूने या गाडीच्या सेवा स्थगित केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तानकडून एकही प्रवासी येत नसताना आमच्या बाजूने ही गाडी चालवण्यात काहीच अर्थ नाही. हा तणाव निवळल्यानंतर आम्ही या सेवा पुन्हा सुरू करू शकू अशी आशा आहे, असे एका सूत्राने सांगितले.

दोन्ही देशांतील किमान ४० प्रवासी अटारी येथे अडकून पडले आहेत अशी माहिती असल्याचेही या सूत्राने सांगितले.

पाकिस्तानने बुधवारी या गाडीची त्याच्या बाजूची वाघा-लाहोर फेरी रद्द केली होती. तर २३ भारतीय व तीन पाकिस्तानी अशा २३ प्रवाशांना घेऊन बुधवारी रात्री ११.२० वाजता जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकावरून निघालेली गाडी अटारी येथे येऊन पोहोचली. पाकिस्तानकडून प्रवासी व माल घेऊन येणारी व रात्री साडेबारा वाजता अटारीला पोहोचणारी गाडी पुढील सूचनेपर्यंत येणार नाही, असा संदेश वाघाच्या स्टेशन मास्तरांनी अटारीला दिला.