चिनी सैन्याच्या डोळ्यांदेखत जवानांची कामगिरी

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू असताना गेल्या तीन आठवडय़ांत भारतीय लष्कराने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील सहा नव्या प्रमुख शिखरांवर ताबा मिळवला आहे.

भारतीय लष्कराने २९ ऑगस्ट ते सप्टेंबरचा दुसरा आठवडा या दरम्यान मगर, गुरुंग, रेचेन ला, रेझांग ला, मोखपरी आणि फिंगर ४ जवळील एका महत्त्वाच्या शिखरासह सहा नवीन शिखरे ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. चिनी सैन्यासमोरच भारतीय लष्कराने शिखरांवर ताबा मिळवला. आता त्या भागात भारतीय सैन्य चिनी सैन्यावर नजर ठेवून आहे.

शिखरांवर कब्जा करण्याचा चिनी सैन्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील काठापासून दक्षिणेकडील काठापर्यंत तीनदा हवेत गोळ्या चालविल्या गेल्या, असेही सूत्रांनी सांगितले.

‘ब्लॅक टॉप’ आणि ‘हेल्मेट टॉप’ ही शिखरे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूला आहेत, तर भारताने ताबा मिळवलेली शिखरे भारताचे नियंत्रण असलेल्या भागात आहेत.

३००० चिनी सैनिक तैनात

* भारतीय लष्कराने सहा शिखरे ताब्यात घेतल्यानंतर, चिनी सैन्याने रेझांग ला आणि रेचेन ला शिखरांजवळच्या भागांत सुमारे तीन हजार शस्त्रसज्ज सैनिकांना तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने गेल्या काही आठवडय़ांत आपल्या मोल्दो शिबंदीवर अतिरिक्त सैन्य सज्ज केले आहे.