भारताने सोमवारपासून औपचारिकपणे इराणच्या चाबहार बंदराचे संचालन हाती घेतले आहे. या बंदरामुळे भारत, अफगाणिस्तान आणि इराणमधील व्यापाराला चालना मिळणार आहे. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे बंदर आहे. भारताला यापुढे अफगाणिस्तानला जाण्यासाठी पाकिस्तानची गरज उरणार नाही. पाकिस्तानला बगल देऊन भारताला व्यापारी वस्तू अफगाणिस्तानला पोहोचवता येतील.

अमेरिकेने इराणवर निर्बंध घालताना त्यातून चाबहारला वगळले आहे. इराण, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये चाबहार बंदरासंदर्भात करार झाला आहे. जून २०१५ मध्ये चाबहार बंदर विकसित करण्याचा करार झाला होता. इराणने २०१६ मध्ये चाबहार बंदर विकासाला परवानगी दिली.

चाबहार बंदरचे महत्त्व काय ?
इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेल्या चाबहार बंदरात पाय रोवण्याची संधी मिळाल्याने भारताला या विभागात सामरिक फायदा होणार आहे. चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित केले आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचा आहे. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे. त्यामुळे भारत- इराण – अफगाणिस्तान या तिन्ही देशांसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. चाबहार ते इराणमधील माशादमार्गे युरोप व रशियाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (एनएसटीसी) विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. तो मार्ग तयार झाल्यानंतर भारत ते युरोप समुद्रमार्गाच्या तुलनेत ६० टक्के वेळ आणि ५० टक्के खर्च वाचणार आहे.