क्षी जिनिपग यांच्या भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली/बीजिंग

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणार असल्याचे भारतासह चीनने बुधवारी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर काही तासांतच काश्मीरच्या मुद्यावरून उभय देशांदरम्यान तणावाचे चित्र निर्माण झाले. जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने भारताने त्यास आक्षेप घेतला.

‘‘चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे माध्यमांतील वृत्तांद्वारे कळले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भारताची स्पष्ट भूमिका आहे. चीनलाही भारताची ही भूमिका ज्ञात आहे. त्यामुळे भारताच्या अंतर्गत विषयांवर इतर कोणत्याही देशाने विधान करणे योग्य नाही’’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले.

चीन आणि पाकिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख आला आहे. ‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आपली भूमिका, चिंता याबाबत पाकिस्तानने चीनला माहिती दिली असून, काश्मीरमधील परिस्थितीकडे चीनचे लक्ष असल्याचे चीनने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील संबंधित ठराव, द्विपक्षीय करार आदींच्या आधारे काश्मीरप्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवावा, असे चीनने नमूद केले’, असे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा हे चीन दौऱ्यावर असून, चीन आणि पाकिस्तानने काश्मीरचा उल्लेख केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली.

क्षी जिनपिंग हे दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी शुक्रवारी भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच काश्मीरच्या मुद्यावरून भारताने नापसंती दर्शवली असली तरी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरप्रश्नी चर्चा करणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद, व्यापार आदी विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होईल, असे सांगण्यात आले.