* १५ ऑगस्टपर्यंत उपलब्ध करण्याची घाई * चाचण्या महिन्याभरात करण्याची सूचना

नवी दिल्ली : करोना लसीवरील संशोधन लवकरात लवकर संपवून स्वातंत्र्य दिनापर्यंत (१५ ऑगस्ट) लस सर्वत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) करत असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात ‘आयसीएमआर’ने लसीची मानवी चाचणी करणाऱ्या रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात लस उपलब्ध करण्याची ‘अंतिम तारीख’ नमूद केली आहे.

‘आयसीएमआर’ने भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्स’ या लसीच्या मानवी चाचणीला गेल्या आठवडय़ात परवानगी दिली होती. मानवी चाचणी उशिरात उशिरा ७ जुलैपासून सुरू करावी, असे पत्रात म्हटले आहे. केवळ दीड महिन्यांतील चाचण्यांनंतर ही लस लोकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतक्या घाईघाईत लसीची निर्मिती केली जाणार असेल, तर तिचा दर्जा आणि परिणामकारकतेबाबत शंका घेतली जाऊ  शकते, असा सूरही वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे ही लस विकसित केली आहे. तिच्या मानवी चाचणीपूर्वी आवश्यक संशोधनप्रक्रिया पार पाडल्या आहेत. मानवी चाचणी घेतल्यानंतर १५ ऑगस्टला ही लस सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. याबाबत रुग्णालयांनी असहकार्य केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे ‘आयसीएमआर’च्या पत्रात म्हटले आहे.

‘झायडस’लाही परवानगी

करोनाविरोधात प्रभावी लस वा औषधनिर्मितीसाठी जगभर संशोधन सुरू आहे. विविध देशांमध्ये १०० लसींवर संशोधन केले जात असून त्यापैकी १२ संभाव्य लसींवरील संशोधन प्रगतिपथावर आहे. त्यात भारतामध्ये भारत बायोटेकच्या बरोबरीने झायडस कॅडिया हेल्थकेअर या कंपनीलाही मानवी चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. जुलैमध्येच ही चाचणी सुरू होईल. एक हजार लोकांवर ही चाचणी केली जाणार असून दोन टप्पे तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जातील.

घाई अनाकलनीय!

इतक्या झटपट कुठलीही लस विकसित करता येत नाही. करोनासंदर्भात आणीबाणीची परिस्थिती आहे हे खरे, पण ज्या लसीची मानवी चाचणीदेखील पूर्ण झालेली नाही ती १५ ऑगस्टपर्यंत म्हणजे इतक्या कमी दिवसांत तयार करणे हे अनाकलनीय आहे, असे पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयआयएसआर) विनीता बाळ यांनी स्पष्ट केले.

प्राधान्याचा प्रकल्प

‘आयसीएमआर’ने करोना लसीच्या (बीबीव्ही १५२ कोव्हिड लस) मानवी चाचणीसाठी विशाखापट्टणम्, रोहतक, नवी दिल्ली, पटणा, बेळगावी, नागपूर, गोरखपूर, कट्टणकुलथूर, हैदराबाद, आर्य नगर, कानपूर आणि गोवा अशा १२ शहरांतील रुग्णालयांची निवड केली आहे. या रुग्णालयांना २ जुलै रोजी पत्र पाठवून मानवी चाचण्या जलद गतीने करण्याची सूचना केली आहे. मानवी चाचण्या हा प्राधान्याचा प्रकल्प असून केंद्र सरकारच्या सर्वोच्च पातळीवरून त्यावर देखरेख ठेवली जात असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

यशाची खात्री काय?

‘बायोइथिक्स’चे अनंत भान यांनी लसीच्या जलद गतीने मानवी चाचण्या घेण्याच्या ‘आयसीएमआर’च्या निर्णयावर शंका उपस्थित करणारे काही ट्वीट संदेश प्रसारित केले आहेत. १५ ऑगस्ट ही अंतिम तारीख ठरवताना संबंधित मानवी चाचण्या यशस्वी होतील असे आयसीएमआरने गृहीत धरले आहे का? कुठल्याही लसीची मानवी चाचणी महिन्याभरात कशी पूर्ण होऊ  शकते, असे प्रश्न भान यांनी उपस्थित केले आहेत.