इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या सर्व भारतीय विमान कंपन्यांना इराण, इराक आणि आखाती देशांच्या हवाई मार्गांचा वापर टाळावा असा सल्ला भारत सरकारकडून देण्यात आला आहे. एएनआयने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

नागरी उड्डाण संचालनालयाच्या (डीजीसीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय विमान कंपन्यांसोबत इराण, इराकमधील सध्याच्या परिस्थितीबाबत बैठक पार पडली. यामध्ये त्यांना या देशातील हवाई मार्ग टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विमानाचा प्रवासाचा कालावधी लांबणार आहे. या भागातून एअर इंडियाची सर्वाधिक विमाने जातात तसेच इंडिगो, स्पाइसजेटची विमानेही इराण, इराक आणि पर्शिअन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करतात.

दरम्यान, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईट्सवर मुंबई-लंडन व्यावसायिक विमानांचा मार्ग बदलण्यात आल्याचे दाखवण्यात येत आहे. त्याचबरोबर, इराण, इराक या भागात जे भारतीय राहतात त्यांनीही काळजी घेण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. इराकमधील भारतीयांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याचे आदेशही परराष्ट्र मंत्रालयाकडून दुतावासाला देण्यात आले आहेत.

आणखी वाचा – मिसाइल स्ट्राइकनंतर अमेरिकेच्या विमानांना इराक, इराण, ओमानमधून उड्डाणांवर बंदी

इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इरबिल, ‘अल असद’ आणि ‘ताजी’ या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे. या हल्ल्याद्वारे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला पूर्ण झाल्याचे इराणने म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.