लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात पाकिस्तान समर्थकांनी केलेल्या तोडफोडीची भारताने गंभीर दखल घेतली आहे. भारताने आपली चिंता ब्रिटनला कळवली आहे. दूतावासाबाहेर मंगळवारी झालेले हिंसक विरोध प्रदर्शन ही १५ ऑगस्ट नंतर घडलेली दुसरी घटना आहे. पार्लमेंट स्क्वेअर ते हाय कमिशनपर्यंतच्या काश्मीर फ्रीडम मार्चमध्ये संपूर्ण यूकेमधून अडीजहजार लोक सहभागी झाले होते. यामध्ये खलिस्तानी समर्थकही होते.

आंदोलकांनी दगड, बाटल्या, अंडी, टोमॅटो आणी बूट उच्चायुक्त कार्यालयावर फेकले. त्यामध्ये कार्यालयाच्या अनेक काचा फुटल्या. आम्हाला या गोष्टी अजिबात मान्य नाहीत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आम्ही ब्रिटनला विनंती केली आहे. उच्चायुक्त कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालू रहावे तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रवीश कुमार यांनी दिली.

भारतीय उच्चायुक्तालयाने इमारत परिसरात झालेल्या हल्ल्याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली असून, फोटो शेअर केले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी लंडनच्या महापौरांकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे. तसंच, निदर्शनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.